डोंबिवलीतील अनधिकृत बांधकाम प्रश्नी ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केलेल्या बातम्यांमुळे संतप्त झालेल्या भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी ‘लोकसत्ता’च्या डोंबिवलीच्या प्रतिनिधीला सोमवारी व्यासपीठावरून शिवीगाळ करून धमकावले. अनधिकृत इमारतींमधील रहिवाशांच्या समर्थनार्थ सोमवारी काढलेल्या मोर्चाच्या वेळी हा प्रकार घडला. दोन दिवसांपूर्वीच आमदारांच्या एका सहकाऱ्याने ‘लोकसत्ता’च्या वितरण व्यवस्थापकाला ‘तुमचा अंक घेऊन येणारे टेम्पो आम्ही डोंबिवलीत येऊ देणार नाही आणि लोकसत्ताचे अंक जाळतो’ अशी धमकी दिली होती.
ही घटना ताजी असतानाच आमदार चव्हाण यांनी सोमवारी पालिकेच्या डोंबिवलीतील ह प्रभाग कार्यालयावर काढलेल्या मोर्चादरम्यान ‘लोकसत्ता’चे प्रतिनिधी भगवान मंडलिक यांच्यावर अर्वाच्य भाषेत टीका केली. व्यासपीठावरून बोलताना ते म्हणाले, ‘‘संबंधित प्रतिनिधी एका नगरसेवकाने दिलेल्या फुकट घरात राहतो. त्यामुळे अनधिकृत इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या विरोधात बातम्या देऊन त्यांना रस्त्यावर आणताना त्याला काहीच वाटत नाही. तो कष्टाने कमविलेल्या जागेत राहतच नसल्याने त्याला इतरांचे दु:ख कळत नाही. ‘लोकसत्ता’च्या संपादकांनी या प्रतिनिधीची चौकशी करावी म्हणून आपण जाहीर व्यासपीठावरून हे वक्तव्य करीत आहोत. माझा हा निरोप लोकसत्ताच्या संपादकांना द्या.’’ ‘टीआरपी’ वाढविण्यासाठी ‘लोकसत्ता’ अशा प्रकारच्या बातम्या देत असल्याचा आरोप त्यांनी केला.
शीळफाटा इमारत दुर्घटनेत ७४ जणांचे बळी गेल्यानंतर अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालू नका, अशी भूमिका सर्वपक्षीय नेत्यांनी घेतली होती. याच भूमिकेस अनुसरून आमदारांच्या अनधिकृत बांधकामविषयक भूमिकेबाबत तसेच रहिवाशांच्या समर्थनासाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चाविषयी ‘लोकसत्ता’ने आक्रमक भूमिका घेतल्याने आमदार चव्हाण संतप्त झाले आहेत. पालिका प्रशासनाचा निषेध करण्याच्या नावाखाली झोपडपट्टी महासंघाचा पाठिंबा घेऊन चव्हाण यांनी मोर्चा काढला होता. या मोर्चाला भाजपचा एकही नगरसेवक उपस्थित नव्हता. फक्त मोजकेच पदाधिकारी व्यासपीठाच्या अवतीभवती होते. आमदार रवींद्र चव्हाण यांनी ‘लोकसत्ता’विषयक घेतलेल्या भूमिकेचा शहरातील विविध क्षेत्रातील नागरिकांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.
याशिवाय भाजपच्या काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती तातडीने पक्षाच्या प्रदेश नेत्यांना दिली.
बेकायदा बांधकामे पाडून तर दाखवा
बेकायदा बांधकामांवर कारवाई सुरु केली तर याद राखा, अशी धमकी भारतीय जनता पक्षाचे डोंबिवलीचे आमदार रिवद्र चव्हाण यांनी सोमवारी कल्याण डोंबिवली महापालिकेला दिली. रहिवाशांना बेघर केलेत तर या ठिकाणाहून तुम्हाला परत जाऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी एका मोर्चादरम्यान दिला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 30, 2013 5:01 am