सरकारमध्ये सामील असतानाही विरोधकाची भूमिका बजावणाऱ्या शिवसेनेला धडा शिकविण्यासाठी ‘मातोश्री’चा गड असलेल्या वांद्रे (पूर्व) विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला पराभवाची धूळ चारण्यासाठी फासे टाकण्याची तयारी भाजपने सुरू केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या मतदारसंघात उमेदवार उभा करून काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांना उघड मदत करायची की शिवसेना उमेदवाराच्या विरोधात छुप्या हालचाली करायच्या, याबाबत भाजपमध्ये खल सुरू आहे. मात्र भाजपने उमेदवार उभा करू नये, यासाठी सेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना विनंती केली आहे.
या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप शिवसेनेला अडचणीत आणण्याच्या प्रयत्नात आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी युती तुटल्याने भाजपनेही या मतदारसंघात उमेदवार उभा करावा, असे काही नेत्यांचे मत आहे. असे केल्यास त्याचा फायदा राणे यांना होण्याची शक्यता आहे. सेनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या व ‘मातोश्री’चे अंगण मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघातच उमेदवार पराभूत झाल्यास शिवसेनेचे खच्चीकरण होईल, असा डाव भाजपच्या गोटात शिजत असल्याचे कळते. पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजप-शिवसेना निवडणूकपूर्व युती होण्याची अजिबात शक्यता नाही. मुंबई महापालिका निवडणुकीतही भाजप-शिवसेनेतील मतभेद आणखी उफाळून येणार आहेत. यामुळे भाजपला अडचणीत आणणाऱ्या शिवसेनेचे नाक कापण्याची संधी भाजप शोधत आहे. सरकारमध्ये त्रास होऊ नये, यासाठी उमेदवार न देण्याचे ठरविले, तरी भाजप कार्यकर्ते आणि नेते शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार न करता राणे यांना मदत करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शिवसेनेने दिवंगत आमदार बाळा सावंत यांची पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी दिली आहे. भाजपच्या कूटनीतीमुळे ‘मातोश्री’च्या गडावरील हा ‘सामना’ चांगलाच रंगतदार ठरणार आहे.