आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील भाजपच्या उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यासाठी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक रविवार, २९ सप्टेंबर रोजी दिल्लीत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ही बैठक होईल व त्यात शिवसेनेबरोबरच्या जागावाटपावरही शिक्कामोर्तब करण्यात येईल.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी नुकतीच दिल्लीत महाराष्ट्रातील जागा व उमेदवारांबाबत चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यावेळी परदेशात असल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले नव्हते. मोदी हे शनिवारी रात्री परदेश दौऱ्यावरून भारतात परत येत आहेत. त्यामुळे रविवारी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. महाराष्ट्रातील भाजपचे उमेदवार व युतीच्या जागावाटपावर त्यावेळी अंतिम निर्णय घेण्यात येईल. मोदी यांच्याबरोबरच अमित शहा, जे. पी. नड्डा, महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आदी ज्येष्ठ नेते या बैठकीत सहभागी होतील, असे सांगण्यात आले.

भाजपने केलेल्या सर्वेक्षणात निर्विवादपणे जिंकण्याची शक्यता असलेल्या उमेदवारांची यादी तयार करण्यात आली आहे. त्याशिवाय ज्या ठिकाणी दोन उमेदवार स्पर्धेत आहेत अशा जागांची वेगळी यादी आहे. या दोन्ही याद्या पंतप्रधान मोदी यांच्यासमोर ठेवून त्यांच्या संमतीने अंतिम यादी निश्चित केली जाईल. तसेच युतीच्या जागावाटपावरही निर्णय होईल, असे सांगण्यात आले.

नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मुख्यमंत्र्यांचे नऊ  संकल्प

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील नवीन भारताची कल्पना पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील पाच वर्षांत महाराष्ट्राला वेगळ्या उंचीवर पोहोचवण्याचे लक्ष्य ठेवत नवमहाराष्ट्रासाठी नऊ संकल्प हे अभियान हाती घेतल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. दुष्काळमुक्ती, सर्वाना मिळेल सर्व अधिकार, शेवटच्या व्यक्तीचा विकास, सशक्त महिला, युवकांना स्थायी रोजगार, बळीराजाची समृद्धी, प्राथमिक आरोग्य-उपचार, महाराष्ट्राचे वैभव, पारदर्शक व स्वच्छ कारभार असे नऊ संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी पाच वर्षांसाठी ठेवले असून ते घेऊनच विधानसभा निवडणुकीत लोकांसमोर जाऊ, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

पंचाहत्तर वर्षांवरील नेत्यांना उमेदवारी नाही : भाजपच्या नियमाप्रमाणे वयाची ७५ वर्षे पूर्ण झालेल्या आमदारांना-नेत्यांना उमेदवारी देण्यात येणार नाही, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले. त्यामुळे मुलुंडचे सरदार तारासिंह यांना उमेदवारी मिळणार नाही हे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनाही ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने त्यांचे भवितव्य काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

प्रत्येकाला किमान ३०० चौरस फुटांचे घर : राज्यातील प्रत्येक कुटुंबाला राहण्यासाठी मालकी हक्काचे किमान ३०० चौरस फुटांचे घर देण्यासाठी आणि गावागावात-घराघरात नळाने पाणी पोहोचवण्यासाठी भाजपचे सरकार काम करत आहे. पुराचे पाणी मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात वळवण्यासाठीही अभ्यास करण्यात येत आहे.