विधानसभेच्या पायऱ्यांवर भाजपची निदर्शने

नागपूर : सत्ताधाऱ्यांनी अहंकारापोटी मुंबईकरांच्या मेट्रो कारशेडला स्थगिती दिली आहे. तातडीने ती उठवा, अशी मागणी करीत शुक्रवारी आमदार आशीष शेलार यांच्या नेतृत्वाखाली भाजप आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर निदर्शने केली.

‘स्थगिती सरकार हाय हाय’, ‘मेट्रो कारशेडवरील स्थगिती तात्काळ उठवा’, ‘मुंबईकरांचे रोज होणारे पावणेपाच कोटींचे नुकसान थांबवा’, ‘मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देणाऱ्या सरकारचा निषेध असो’, ‘सामनात खूप.. सभागृहात चूप..’ अशा घोषणा दिल्या.

माध्यमांशी बोलताना शेलार म्हणाले, मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी म्हणून फडणवीस सरकारने अत्यंत वेगाने मेट्रोची कामे सुरू केली. ती पूर्णत्वास जात असतानाच नव्या सरकारने मेट्रोच्या कामाला स्थगिती दिली. त्यामुळे मुंबईकरांचे रोज पावणेपाच कोटींचे नुकसान होत असून प्रकल्पाची किंमत वाढत आहे. केवळ अहंकारापोटी स्थगिती देण्यात आली असून ती तत्काळ उठवावी, यासाठी या स्थगिती सरकारचे लक्ष वेधत आहोत, असे त्यांनी सांगितले.

या वेळी आमदार राम कदम, अमित साटम, कालिदास कोळमकर, पराग शहा, भारती लव्हेकर उपस्थित होते.