News Flash

Pradeep Sharma Arrest : “या सगळ्यांचे गॉडफादर उद्धव ठाकरे”, नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!

प्रदीप शर्मा यांच्या घरावर एनआयएनं छापा टाकल्यानंतर भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करत थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केला आहे.

प्रदीप शर्मांच्या अटकेवरून नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

एकेकाळी मुंबईपासून ते दुबईपर्यंतचे नामी गुंड, गँगस्टर ज्यांच्या रडारवर असायचे, ते एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा आता राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएच्या रडारवर आले आहेत. प्रदीप शर्मा यांच्या अंधेरी येथील घरी गुरुवारी सकाळी ६ वाजता एनआयएनं छापा टाकला. मनसुख हिरेन हत्या प्रकरणी एनआयएनं हा छापा टाकल्यानंतर दुपारच्या सुमारास प्रदीप शर्मा यांना एनआयएनं अटक केली आहे. मात्र, यामुळे विरोधकांनी आपला विरोध तीव्र केला आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांनी NIA (National Investigation Agency) च्या या कारवाईनंतर थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केला आहे. “या सगळ्यांचे गॉडफादर हे उद्धव ठाकरे” असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

सगळेच शिवसेनेशी संबधित कसे?

नितेश राणे यांनी यासंदर्भात ट्वीट करून हा आरोप केला आहे. “अँटिलिया स्फोटकं प्रकरण किंवा मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणामध्ये अटक होणारा किंवा चौकशी केली जाणारा प्रत्येक जण शिवसेनेशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संबंधित कसा असतो? हा फक्त योगायोग असू शकत नाही! आणि तरी देखील आपण विचार करतोय की यांचा गॉडफादर कोण असेल? ते उद्धव ठाकरे आहेत!” असं ट्वीट नितेश राणे यांनी केलं आहे. कधीकाळी शिवसेनेचे फायरब्रँड नेते राहिलेले नारायण राणे यांच्या पुत्राकडूनच हा आरोप झाल्यामुळे त्यावर राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

 

शिवसेना कनेक्शन!

अँटिलियाबाहेर एका स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या आढळून आल्यामुळे मुंबईत मोठा गोंधळ उडाला होता. मात्र, या स्कॉर्पिओचे मालक व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येमुळे तर त्याहून मोठा गोंधळ झाला. या प्रकरणात आत्तापर्यंत ४ जणांना अटक केली असून त्यामध्ये तीन पोलिसांचा समावेश आहे. त्यापैकी एक असलेले सचिन वाझे हे अधिकृतरीत्या शिवसेनेचे पदाधिकारी-नेते राहिले आहेत. त्यासोबतच आज अटक करण्यात आलेले प्रदीप शर्मा यांनी देखील २०१९मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. खुद्द विद्यमान मुख्यमंत्री आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनीच प्रदीप शर्मांच्या हातावर शिवबंधन बांधलं होतं. त्यामुळे आता शिवसेनेवर टीका करण्यासाठी विरोधकांच्या हाती आयतंच कोलीत मिळालं आहे.

हिरेन, वाझे आणि आता प्रदीप शर्मा…. समजून घ्या अँटिलिया प्रकरण आहे तरी काय?

अँटिलियाबाहेर स्फोटकं ठेवण्यात आलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणाचा एनआयएकडून तपास सुरू आहे. त्यासंदर्भातच प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली आहे. शर्मा यांना बहुचर्चित रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभैया हत्येप्रकरणी (बनावट चकमक) अटक झाली होती. सुमारे तीन वर्षे ते कारागृहात होते. मनसुख हत्येप्रकरणी एनआयएने अटक केलेला निलंबित पोलीस शिपाई विनायक शिंदे लखनभैया हत्या प्रकरणात सहआरोपी होता. या गुन्ह्यातून शर्मा वगळता उर्वरित सर्व आरोपींना(शिंदेसह) न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा ठोठावली. निर्दोष मुक्त झाल्यानंतर शर्मा यांनाही पुन्हा सेवेत घेण्यात आले. सध्या चर्चेत असलेले परमबीर सिंह ठाणे शहरात पोलीस आयुक्त असताना शर्मा यांच्याकडे तेथील खंडणीविरोधी पथकाच्या प्रमुखपदाची जबाबदारी होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2021 2:55 pm

Web Title: bjp mla nitesh rane allegations on uddhav thackeray pradeep sharma nia raid pmw 88
Next Stories
1 Mansukh Hiren Murder : एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांना अटक! २८ जूनपर्यंत पोलीस कोठडी!
2 “सचिन वाझे प्रकरणात शर्मांवर संशयाची सुई जाणं अपेक्षित होतं”
3 हिरेन, वाझे आणि आता प्रदीप शर्मा…. समजून घ्या अँटिलिया प्रकरण आहे तरी काय?
Just Now!
X