News Flash

पोलिसाला मारहाण करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांची सुटका करण्यासाठी राम कदमांचा फोन; ऑडिओ क्लिप व्हायरल

राम कदम आणि पोलीस कॉन्स्टेबलमध्ये संवाद

संग्रहीत छायाचित्र

पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या आरोपींची सुटका करण्यासाठी भाजपा आमदार राम कदम यांनी फोन केल्याची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. राम कदम आणि पोलीस कॉन्स्टेबलमध्ये झालेल्या या संभाषणात राम कदम आरोपींची सुटका करण्यास सांगत आहेत. पवई पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल नितीन खैरमोडे यांना आरोपींनी मारहाण केली होती.

सचिन तिवारी, दिपू तिवारी आणि आयुष राजभर अशी या आरोपींची नावं असून ते दुचाकीवरुन ट्रिपल सीट प्रवास करत होते. याशिवाय त्यांनी एका वाहनालाही धडक दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र यानंतरही आरोपींकडून कायद्याचं उल्लंघन केलं जात होतं. पोलीस रिक्षामधून आरोपींना पोलीस ठाण्यात नेत असताना आरोपींनी कॉन्स्टेबल नितीन खैरमोडे यांच्यासोबत गैरवर्तन तसंच मारहाण केली.

यानंतर राम कदम यांनी पोलिसांना फोन करुन आरोपींना सोडून देण्याची विनंती केली. “मी हल्ल्याचं समर्थन करत नाही. पण हा त्यांच्या करिअरचा प्रश्न आहे. त्यांचं अजून लग्नही झालेलं नाही. माणुसकीच्या नात्याने आणि त्यांच्या भविष्याचा विचार करता आपापसातही हे प्रकरण मिटलं असतं. तुम्ही इच्छा असेल तर कानाखाली मारा,” असं राम कदम सांगत असल्याचं ऐकू येत आहे.

आणखी वाचा- मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवाला अटकेत; एनसीबीची कारवाई

राम कदम यांनी यावेळी त्यांची सुटका करा सांगणं योग्य नाही असं सांगत यामुळे त्यांचं करिअर संपेल असं म्हटलं. दुसरीकडे कॉन्सेबल राम कदम यांना मी आमदार म्हणून तुमचा आदर करतो, पण जर त्यांची सुटका केली तर महाराष्ट्र पोलिसांना मारहाण करण्याची हिंमत त्यांच्यात येईल असं उत्तर दिलं.

“तिघांनीही एका पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे. माझ्याजागी तुम्ही असता तर काय केलं असतं? त्यांनी माझ्यासोबत गैरवर्तन केलं आहे. माझाही आत्मसन्मान आहे,” असं पोलीस कॉन्स्टेबल बोलताना ऐकू येत आहे. यावेळी त्याने आपण तुमची मदत करु शकत नाही असंही राम कदम यांना सांगितलं. आरोपी घाटकोपर आणि विक्रोळीमध्ये काम करत असल्याची माहिती आहे. याशिवाय ते भाजपाच्या आयटी सेल आणि इतर विभागांमध्येही काम करतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2021 11:09 am

Web Title: bjp mla ram kadam audio clip to release bjp workers who assault cops in powai sgy 87
Next Stories
1 मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवाला अटकेत; एनसीबीची कारवाई
2 अकरावीच्या प्रथम प्राधान्य फेरीसाठी सव्वा लाख जागा
3 ‘टाटाच्या खारघर केंद्रातील विषाणू धोकादायक नाही’
Just Now!
X