‘पद्मावती’ चित्रपटाविरोधात करणी सेनेने भारत बंदचा इशारा दिलेला असतानाच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहून चित्रपटाला विरोध करणे गैरच आहे असे त्यांनी म्हटले आहे. राम कदम यांनी ‘पद्मावती’ चित्रपटाला दर्शवलेला विरोध म्हणजे पब्लिसिटी स्टंट असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

‘पद्मावती’ चित्रपटावरुन देशभरात वाद निर्माण झाला असून करणी सेनेने या चित्रपटाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशाराच करणी सेनेने दिला आहे. या वादावर चित्रपट नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी बुधवारी ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना प्रतिक्रिया दिली. ट्रेलर पाहून चित्रपटाला विरोध दर्शवणे चुकीचे आहे, आधी चित्रपट प्रदर्शित होऊ द्या, चित्रपट पाहा आणि मग काही आक्षेप असेल तर विरोध करावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. आमचा चित्रपटाला विरोध नाही, असेही त्यांनी सांगितले.

भाजप आमदार राम कदम यांनीदेखील ‘पद्मावती’ला विरोध दर्शवला होता. यावरुनही खोपकर यांनी टीकास्त्र सोडले. राम कदम सत्ताधारी पक्षातील आमदार आहे. राज्यात भाजपची सत्ता आहे, हिंमत असेल तर त्यांनी हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देऊ नये, असे खोपकर म्हणालेत.

विरोधाच्या पार्श्वभूमीवर ‘पद्मावती’चा विशेष शो 
‘पद्मावती’ चित्रपटाला वाढत्या विरोधानंतर दिग्दर्शक आणि निर्माते संजयलीला भन्साळी आठवडाभरात विशेष शोचे आयोजन करणार आहेत. या शोसाठी विविध पक्षाच्या नेत्यांनाही आमंत्रित केले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.