आमदार गोपाळ शेट्टी यांच्यासह सात जणांविरुद्ध बोरिवली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. एका महिलेची मालमत्ता खोटे दस्तावेज बनवून विकत घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
बोरिवलीत राहणाऱ्या रिटा दादरकर यांच्या पतीच्या नावे कांदिवलीच्या पोईसर परिसरात एक मालमत्ता होती. शेट्टी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने ही मालमत्ता बनावट कागदपत्रे बनवून आपल्या नावावर केल्याचा दादरकर यांचा आरोप आहे. जीवे ठार मारण्याची धमकीही दिल्याची तक्रार त्यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार बोरिवली पोलिसांनी शेट्टी यांच्यासह बोरिवलीतील निबंधक, भूमापन अधिकारी आदी सात जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला़