रेडी रेकनरचे दर आगामी वर्षांत वाढवू नयेत, अशी मागणी भाजप खासदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. हे दर वाढले, तर मुंबईत घर घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाईल, अशी भीती भातखळकर यांनी व्यक्त केली आहे. शासनाला दर अगदी वाढवायचेच असतील, तर ८०० चौ. फुटांपेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या सदनिकांच्या व्यवहारांसाठी वाढवावेत, असे भातखळकर यांनी स्पष्ट केले. रेडी रेकनरचे दर वाढविण्यासंदर्भात उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत भातखळकर यांनी ही मागणी केली. रेडी रेकनरचे दर वाढविल्यामुळे शासनाचा महसूल वाढतो. पण सध्या घरबांधणी क्षेत्राची अवस्था वाईट आहे. लाखो घरांची विक्री न झाल्याने ती पडून आहेत. प्रत्येक विभागासाठी वेगवेगळे दर असून त्यात मोठय़ा प्रमाणावर संदिग्धता आहे आणि त्यातून भ्रष्टाचाराला वाव मिळत आहे. त्यामुळे आगामी वर्षांत रेडी रेकनरचे दर वाढविल्यास सर्वसामान्यांना घर घेणे परवडणार नाही, अशी भूमिका भातखळकर यांनी मांडली.