News Flash

Maratha Reservation : “राज ठाकरेंचं माझ्या भूमिकेला समर्थनच”, भेटीनंतर संभाजीराजेंची प्रतिक्रिया!

खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

संभाजीराजे भोसले यांनी राज ठाकरेंची भेट घेतली.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण देणारा कायदा रद्द केल्यानंतर या चर्चेला तोंड फुटलं असून आता हे आरक्षण कसं मिळवता येईल, यावर खलबतं सुरू आहेत. एकीकडे राज्य सरकराने नियुक्त केलेल्या उपसमितीच्या माध्यमातून यासाठी प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे भाजपा खासदार संभाजीराजे भोसले यांनी देखील समांतरपणे मराठा आरक्षणाविषयी हालचाल करायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ते राज्यातील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. गुरुवारी सकाळी संभाजीराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर दुपारी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना चर्चेचा वृत्तांत सांगितला.

राज ठाकरेंचे आजोबा आणि आमच्या पणजोबांचं मित्रत्व!

या भेटीविषयी बोलताना संभाजीराजे भोसले यांनी राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या मैत्रीचा देखील दाखला दिला. “राज ठाकरेंची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. ते जात-पात मानत नाहीत. पण गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं या मताचे ते आहेत. माझ्या भूमिकेला ते समर्थन देखील करतात. माझे पणजोबा राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे जिवलग मित्र होते. ते नातं छत्रपती घराण्याचं आणि ठाकरे घराण्याचं आजही आहे. शिवाय किल्ल्यांचं संवर्धन आणि जतन या मुद्द्यावर देखील आमचं एकमत आहे. त्यामुळे किल्ल्यांचं जतन आणि संवर्धन कसं करता येईल, यावर देखील आमची चर्चा झाली”, असं संभाजीराजे म्हणाले.

“उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, नारायण राणे यांना एकत्र आणा,” संभाजीराजेंची शरद पवारांकडे विनंती

“मी सगळ्या पक्षाच्या प्रमुखांची भेट घेतोय. माझ्यासाठी नाही तर समाजासाठी. सकाळी पवार साहेबांना भेटलो. उद्या देवेंद्रजी आणि मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनाही भेटणार आहे. मराठा समाज हा महाराष्ट्रात प्रमुख समाज आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचं आरक्षण रद्द केलं आहे. त्यातून मार्ग काढण्याची जबाबदारी माझीच नाही तर सर्व पक्षांची आहे. समाजाला न्याय मिळावा यासाठीचा हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे”, असंही ते म्हणाले.

शरद पवारांना केली विनंती

दरम्यान सकाळी शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर देखील संभाजीराजे भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. “तीन-चार दिवस मी महाराष्ट्राचा दौरा केला. मराठा समाज किती अस्वस्थ, दु:खी आहे हे मी शरद पवारांना सांगितलं. मराठा समाजावर अन्याय होत आहे. मी सर्व परिस्थिती त्यांच्या कानावर घातली. मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, नारायण राणे, अजित पवार अशा सर्वांनाच एकत्र आणण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा अशी विनंती मी त्यांना यावेळी केली,” असं संभाजीराजेंनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2021 4:28 pm

Web Title: bjp mp sambhaji raje bhosale meet raj thackeray on maratha reservation pmw 88
Next Stories
1 तौते चक्रीवादळाचा फटका बसलेल्या आपल्या शिक्षिकेला राज ठाकरेंचा फोन; दिलं मदतीचं आश्वासन!
2 ‘माझ्या नशीबामुळे पेट्रोलचे दर कमी झाले तर जनतेसाठी चांगलं…’ मोदींचा जुना व्हिडिओ व्हायरल
3 “उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, नारायण राणे यांना एकत्र आणा,” संभाजीराजेंची शरद पवारांकडे विनंती
Just Now!
X