सोमवारी म्हणजेच उद्या सकाळी गुजरात आणि हिमाचल विधानसभा निवडणुकांसाठी मतमोजणी होणार आहे. मात्र सोमवारच्या जल्लोषाची तयारी भाजपने आदल्या दिवसापासूनच केल्याचे दिसून येत आहे. याचे कारण ठरले आहेत ते म्हणजे मुंबईमधील भाजप मुख्यालयाबाहेर लागलेले बॅनर.

मुंबईतील नरिमन पॉईंट भागात असलेल्या भाजप मुख्यालयाच्या कार्यालयाबाहेर बॅनर लावण्यात आले आहे. ज्यावर जल्लोष असे लिहिण्यात आले असून ‘गुजरात-हिमाचल भाजपा की जीत’ असा मजकूरही छापण्यात आला आहे. बॅनरच्या एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे फोटो आहेत. तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचे फोटो आहेत. एवढेच नाही तर मुंबईचे कार्यालय झेंडे लावून सजवण्यातही आले आहे. या बॅनरजवळच एका स्टेजचीही उभारणी करण्यात येते आहे.

मुंबईतील भाजप कार्यालयाबाहेर लावण्यात आलेले बॅनर आणि सुरु असलेली तयारी

मुंबईत एकीकडे हे चित्र दिसून येते आहे. तर दुसरीकडे पुण्यातही विजयाचा देखावाही साकारण्यात आला आहे. स्टेजवर उभे राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत आहेत अशा आशयाचा देखावा मुंबईत दाखवण्यात आला आहे. मतमोजणी सोमवारी होणार आहे. गुजरात आणि हिमाचलमध्ये काय होणार हे उद्या स्पष्ट होणार आहे अशात भाजपने मात्र मुंबई आणि पुण्यात एक दिवस आधीच विजयाची तयारी सुरु केलेली दिसून येते आहे.

पुण्यात भाजपकडून उभारण्यात आलेला देखावा

गुजरात आणि हिमाचलच्या विधानसभा निवडणुकांसाठी नुकत्याच निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांचा निकाल उद्या म्हणजेच सोमवारी लागणार आहे. गुजरातमध्ये कोणाची सत्ता येणार? हिमाचलमध्ये कोणाची सत्ता येणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे सोमवारी मिळणार आहेत. गुजरातचे विकासाचे मॉडेल पुढे करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपला देशात झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवून दिला. आता त्यांचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्ये कमळ फुलणार की नाही हे उद्या स्पष्ट होणार आहे. अनेक एग्झिट पोल्सनी भाजपचीच सत्ता गुजरात मध्ये येणार हे अंदाज वर्तवले आहेत. आता सगळ्या देशाच्या नजरा उद्या लागणाऱ्या निकालाकडे लागल्या आहेत. अशात मुंबई आणि पुण्यात जल्लोषाचे वातावरण दिसून येते आहे.