नगरसेवकाच्या मागणीला पक्षाचे पाठबळ नसल्याची शेलार यांची माहिती
शिवसेनेच्या वडापाव स्टॉलच्या धर्तीवर नमो टी स्टॉल आणि खाद्यपदार्थाच्या स्टॉलला परवानगी देण्यासाठी भाजप नगरसेवकाने दिलेल्या पत्रावरून वाद सुरू झाला असतानाच नमो टी स्टॉल ही भाजपची अधिकृत भूमिका नसल्याची सारवासारव मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांनी शनिवारी केली.
भाजपचे नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी मंबईत नमो टी स्टॉल उभारण्याची संकल्पना महापौरांकडे पाठवली होती. दुष्काळग्रस्त भागातून उपजीविकेसाठी मुंबईमध्ये आलेल्यांना रोजगार तसेच पालिकेला मासिक भाडय़ापोटी उत्पन्न मिळेल, असे गंगाधरे यांनी सुचवले होते.
शुक्रवारी पालिकेच्या गटनेत्यांच्या बैठकीत ही मागणी चर्चेसाठी आली. या पत्रावर प्रशासनाचा अभिप्राय मागवण्यात आला.
शिवसेनेच्या वडापावच्या स्टॉलला प्रतिस्पर्धी म्हणून या मागणीकडे पाहिले गेले व त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या. मात्र ही भाजपची अधिकृत संकल्पना नाही. गंगाधरे यांनी ती वैयक्तिक पातळीवर मांडली आहे. पंतप्रधानांसारख्या विशेष व्यक्तीचा फोटो किंवा नाव एखाद्या शासकीय योजनेसाठी वापरताना राजशिष्टाचार पाळावा लागतो. मात्र असा शिष्टाचार न पाळता ही संकल्पना मांडली गेली. अधिकृत स्टॉल किंवा अतिक्रमणाला अधिकृत करण्याचे प्रयत्न कोणी करू नयेत, असे आशीष शेलार यांनी स्पष्ट केले. शेलार यांच्या स्पष्टीकरणामुळे नव्या वादाला तूर्त तरी पूर्णविराम मिळाला आहे.