बनावट स्टॅम्प प्रकरणातील आरोपी असलेल्या अब्दुल करीम तेलगी प्रकरणाचे पडसाद गुरुवारी थेट विधानसभेत उमटले. भाजपचे धुळ्याचे आमदार अनिल गोटे आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांच्यात विधानसभेतच जोरदार खडाजंगी झाली. तेलगी-भुजबळ संबंधाबाबत अनिल गोटे यांनी केलेले विधान कामकाजाच्या नोंदीतून काढून टाकण्याचे आदेश अध्यक्षांनी दिले. मात्र गोटे यांनी सभागृहाबाहेर येऊन माध्यमांसमोर त्या आरोपांचा पुनरुच्चार केला. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आर. एस. शर्मा यांची नियुक्ती करण्यासाठी भुजबळ यांनी पैसे घेतल्याचाही आरोप त्यांनी माध्यमांशी बोलताना केला.
अनिल गोटे यांनी बुधवारी विधानसभेत जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. आव्हाड सांगलीमध्ये जातीय द्वेष पसरवित असल्याचा आरोपही केला होता. त्यावर उत्तर देताना आव्हाड यांनी गोटे यांचा ‘तेलगी मित्र’ असा उल्लेख करून प्रतिटोला हाणला होता. या आरोप-प्रत्यारोपामुळे सभागृहात गदारोळ झाला.