‘काँग्रेसमुक्त भारत’ हे भाजपचे उद्दिष्ट असले तरी त्याची महाराष्ट्रात पूर्तता करण्याकरिता भाजपला राष्ट्रवादीची साथ मिळणार आहे. कारण काँग्रेस कमकुवत झाल्याशिवाय राज्यात पक्ष वाढणार नाही हे ओळखून राष्ट्रवादीने पुढील निवडणुकीपर्यंत काँग्रेसला पार गाळात घालण्याचा निर्धार केला आहे.
विधानसभा निवडणुकीत चांगल्या यशाची अपेक्षा नसली तरी काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळतील, असा राष्ट्रवादीला अंदाज होता. पण १९९९ प्रमाणेच राष्ट्रवादीचा अंदाज चुकला आणि काँग्रेसला एक जागा जास्त मिळाली. सध्या राष्ट्रवादीने भाजपची जवळीक वाढविली असली तरी पुढील निवडणुकीपर्यंत पक्ष राज्यात सक्षम झाला पाहिजे, असे पक्षाचे धोरण आहे. देशात सर्वत्रच काँग्रेस कमकुवत झाली आहे. महाराष्ट्रात काँग्रेसला राजकीयदृष्टय़ा संपविल्यास ही जागा आपल्याला घेता येईल, असे राष्ट्रवादीचे गणित आहे. काँग्रेसला कोणत्या मार्गाने पेचात पकडता येईल, या दृष्टीने राष्ट्रवादीची पाऊले पडत आहेत. विधान परिषदेत काँग्रेसचे संख्याबळ कमी असल्याने सभापती शिवाजीराव देशमुख यांना पदावरून दूर करण्यावर राष्ट्रवादीने भर दिला आहे. यापुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर पदे मिळाली अशा ठिकाणी काँग्रेसला अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू होतील, असा काँग्रेस नेत्यांना अंदाज आहे. भविष्यात काँग्रेसशी कोणतेही संबंध नकोत, अशी जाहीरपणे भूमिका अजित पवार यांनी मांडली आहे.
काँग्रेसचे राजकीयदृष्टय़ा खच्चीकरण करण्याकरिता भाजप आणि राष्ट्रवादी ठरवून प्रयत्न करतील, असे मत प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केले. पण ते कदापी शक्य होणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीची पाऊले ज्या पद्धतीने पडत आहेत त्यावरून काँग्रेस हाच राष्ट्रवादीचा शत्रू असल्याचे स्पष्ट होते, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.
‘काँग्रेसमुक्त भारत’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांची योजना राज्यात प्रत्यक्षात आणणे काहीच अवघड नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे. राष्ट्रवादीचे हेच धोरण आहे. स्थिर सरकारसाठी भाजपला पाठिंबा दिल्याचे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केले असले तरी भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये पडद्याआडून समझोता झाल्याचे मानले जाते. दोन समविचारी पक्षांमधील स्पर्धेपेक्षा एक राजकीयदृष्टय़ा कमकुवत व्हावा, असा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपच्या वतीने राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या मागे लचांड लावून काँग्रेसला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही.