दुष्काळाला यापूर्वीचे आघाडी सरकार आणि उसाकरिता उपसले जाणारे भरमसाट पाणी कारणीभूत असल्याचे खापर सत्ताधारी भाजपकडून फोडले जात असतानाच ऊस उत्पादकांच्या बाजूने राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार रिंगणात उतरले आहेत. उसाला जास्त पाणी लागते ही टीकाच चुकीची असल्याचा युक्तिवाद पवार यांनी केला आहे.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर ऊस आणि या पिकासाठी लागणारे पाणी हा विषय चर्चेत आला आहे. उसाला जास्त पाणी लागते व त्यातूनच पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र भाजपकडून उभे केले जात आहे. चारच दिवसांपूर्वी लोकसभेत केंद्रीय कृषिमंत्री राधेमोहन सिंग यांनीही राज्यातील दुष्काळाचे खापर साखर कारखाने आणि उसावर फोडले होते. उसाचे क्षेत्र आणि साखर कारखान्यांवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे वर्चस्व असल्याने भाजपने पाण्याच्या टंचाईच्या प्रश्नावर ऊस आणि पाण्याचा अतिरिक्त वापर असे गणित मांडून दोन्ही काँग्रेसवर सारे खापर फोडण्याचा प्रयत्न केला आहे. मराठवाडय़ात नव्या साखर कारखान्यांना परवानगी नाकारणे किंवा उसासाठी पाण्याचा अतिरिक्त वापर होतो म्हणून उसाचे क्षेत्र कमी व्हावे, अशी योजना भाजपने मांडली आहे. पाणीटंचाईचे सारे खापर उसाच्या पिकावर फोडण्यात आल्याने भाजपमधील पश्चिम महाराष्ट्रातील नेते अस्वस्थ झाले आहेत. सरकार उसाच्या विरोधात नाही, असे स्पष्टीकरण सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी करावे लागले.
भाजपने ऊस आणि साखर कारखान्यांना लक्ष्य केल्याने राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी ऊस उत्पादकांची बाजू उचलून धरली आहे. ऊस आणि साखर कारखान्यांच्या क्षेत्रात भाजपच्या विरोधात वातावरणनिर्मिती करण्यावर पवार यांनी भर दिला आहे. उसामुळे पाण्याचा प्रश्न निर्माण होतो, हा दावा पवार यांनी राज्यसभेत दुष्काळी चर्चेत सहभागी होताना खोडून काढला होता. तांदूळ, गहू, ज्वारी याप्रमाणेच साखर ही जीवनावश्यक बाब आहे. भाजपच्या मंडळींना ऊस आणि साखर बहुधा नको असावी, असा चिमटाही काढला. उसाला जादा पाणी लागते, हा आरोप कसा चुकीचा आहे हे सांगताना त्यांनी तामिळनाडूमधील कोईम्बतूरच्या कृषी विकास संस्थेने केलेल्या संशोधनाचा हवाला दिला.
उसामुळे पाण्याचा प्रश्न निर्माण होतो, हा काही मंडळींचा दावाच मुळात चुकीचा आहे. पाण्याचा प्रश्न निर्माण होत असल्यास सरकारने शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी मदत करावी. या संदर्भात त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना पुणे जिल्हय़ातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उदाहरण दिले. या कारखान्याने त्यांच्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना ही यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे.