News Flash

“सचिन वाझे ‘वर्षा’वर जाऊन कसे राहायचे?” भाजपा आमदार नितेश राणेंचा गंभीर आरोप!

सचिन वाझे प्रकरणावरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

सचिन वाझे प्रकरणात एनआयए चौकशी करत असताना भाजपाकडून आमदार नितेश राणे यांनी गंभीर आरोप केला आहे. “सचिन वाझे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा माणूस आहे. त्यांनाच रिपोर्टिंग व्हायचं. परमबीर सिंग यांना ते विचारतच नव्हते”, असं नितेश राणे म्हणाले आहेत. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे आरोप केले आहेत. तसेच, “सचिन वाझे वर्षावर जाऊन कसे राहायचे? त्यांना कुणी परवानगी दिली?” असा सवाल देखील नितेश राणेंनी केला आहे. अँटिलियाबाहेर सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या प्रकरणी एनआयए चौकशी करत असून सचिन वाझे हे सध्या एनआयएच्याच कोठडीत आहेत.

“… म्हणून सचिन वाझेंना वाचवायचे प्रयत्न झाले”

नितेश राणेंनी सचिन वाझे प्रकरणावरून थेट शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. “सचिन वाझे थेट उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना रिपोर्टिंग करायचे. परमबीर सिंह यांना ते विचारायचे नाहीत. ते आदित्य ठाकरेंसोबत ऑनकॉल होते. म्हणूनच त्यांना वाचवायचे प्रयत्न होत होते”, असं राणे म्हणाले आहेत.

“सचिन वाझे वर्षावर कुणाच्या परवानगीने राहायचे?”

सचिन वाझे वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी राहायचे, असा खळबळजनक आरोप नितेश राणेंनी केला आहे. “सचिन वाझे वर्षावर का राहायचे? वर्षा कुणाचं निवासस्थान आहे? वर्षावर राहायची परवानगी त्यांना कुणी दिली होती? त्यामुळेच सचिन वाझे हा थेट उद्धव ठाकरे यांचा माणूस आहे”, असं नितेश राणे म्हणाले आहेत.

“बाळासाहेब असते तर पहिले आमंत्रण देवेंद्रजींना दिले असते,” नितेश राणेंचं ट्विट

करोनाच्या आकड्यांवरही संशय!

दरम्यान, यावेळी बोलताना नितेश राणेंनी राज्यात वाढत असलेल्या करोनाच्या आकड्यांवर देखील संशय व्यक्त केला. “जेव्हा जेव्हा हे सरकार अडचणीत आलंय, तेव्हा तेव्हा करोनाचे आकडे वाढले आहेत. सचिन वाझेंचं प्रकरण समोर आलं की लगेच दणादण करोनाचे आकडे वाढायला लागले. फक्त महाराष्ट्रात वाढत आहेत. देशात वाढत नाहीयेत. त्यामुळे याची चौकशी व्हायला हवी. खरंच करोनाचे आकडे वाढत आहेत की स्वत:च्या चुका लपवण्यासाठी या बातम्या घडवल्या जात आहेत आणि लॉकडाऊनच्या धमक्या दिल्या जात आहेत याची चौकशी केली पाहिजे”, असं नितेश राणे म्हणाले आहेत.

“आता फक्त किस्से मोठे!”

दरम्यान, आज सकाळी नितेश राणे यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारक भूमिपूजन कार्यक्रमावरून देखील राज्य सरकारवर निशाणा साधला. “आज मा. बाळासाहेब असते तर, पहिले आमंत्रण देवेंद्रजींना दिले असते. मा. बाळासाहेब मनाचा राजा माणूस ! राजा होण्यासाठी मन मोठं लागतं. त्यांच्यानंतर फक्त किस्से मोठे आहेत, मन खूप लहान झाली आहेत!” असं ट्वीट नितेश राणेंनी केलं होतं. भूमिपूजन कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. त्यावरून नितेश राणेंनी राज्य सरकारवर आणि अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर टीका केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2021 6:36 pm

Web Title: bjp nitesh rane slams uddhav thackeray aaditya thackeray on sachin vaze case pmw 88
Next Stories
1 उद्धव ठाकरे, अजित पवार, बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत बाळासाहेब ठाकरे स्मारक भूमिपूजन सोहळा संपन्न!
2 “अंबानींच्या घराजवळ वाझेंच्या ड्रायव्हरनं पार्क केली होती स्कॉर्पिओ”
3 करोना रुग्णासाठी बेड मिळवायचा असेल तर कुठे संपर्क कराल? पालिकेचे अधिकृत दूरध्वनी क्रमांक जारी!
Just Now!
X