News Flash

“बाळासाहेब असते तर पहिले आमंत्रण देवेंद्रजींना दिले असते,” नितेश राणेंचं ट्विट

"त्यांच्यानंतर फक्त किस्से मोठे आहेत, मन खूप लहान झाली आहेत"

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजन आज पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहित उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई उपस्थित राहणार आहेत. भूमिपूजनासाठी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित करण्यात आलेलं नाही. दरम्यान यावरुन भाजपा आमदार नितेश राणे यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

नितेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “आज मा. बाळासाहेब असते तर, पहिले आमंत्रण देवेंद्रजींना दिले असते. मा. बाळासाहेब मनाचा राजा माणूस ! राजा होण्यासाठी मन मोठं लागतं. त्यांच्यानंतर फक्त किस्से मोठे आहेत, मन खूप लहान झाली आहेत!”.

दरम्यान यावेळी त्यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनाही आमंत्रण न देण्यावरुन आश्चर्य व्यक्त केलं आहे. “नगरविकास मंत्री एकनाथ यांनाही निमंत्रण कसं नाही? प्रोटोकॉल? आश्चर्य”.

संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास भूमिपूजनाचा हा कार्यक्रम पार पडणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या उपस्थितांसह कार्यक्रम पार पडेल आणि त्याचं ऑनलाइनच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या दादरमधील स्मारकासाठी ४०० कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या मंजूरी देण्यात आली आहे. महापौर निवासात ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. यासाठी दोन टप्प्यांमध्ये काम करण्यात येणार आहे. इमारतींचे बांधकाम, वाहनतळ, उद्यान आदी कामे करण्यात येतील,. दुसऱ्या टप्प्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान, लेझर शो, ग्रंथालय, चित्रपट आदी कामांचा समावेश आहे. या स्मारकासाठी सुरुवातीचा खर्च मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाकडून केला जाईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2021 11:07 am

Web Title: bjp nitesh rane tweet balasaheb thackeray memorial maharashtra cm uddhav thackeray sgy 87
Next Stories
1 शरद पवारांनी शस्त्रक्रियेनंतर स्वत:ला गुंतवून घेतलं आवडत्या कामात; लेकीनेच ट्विट केला फोटो
2 “मनसुख हिरेन यांच्या हत्येचा कट शिजलेल्या बैठकीला सचिन वाझे होते हजर “
3 मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे रुग्णालयात दाखल
Just Now!
X