दिवाळीच्या तोंडावर भडकलेल्या महागाईत सिलिंडर नियंत्रणाचे चटके जनतेला सोसावे लागू नयेत यासाठी राज्यातील जनतेला सहाऐवजी १२ सिलिंडर सवलतीच्या दरात देण्याचा निर्णय दिवाळीपूर्वी जाहीर करावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आली.
भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून राज्यभर काँग्रेस आघाडी सरकारला धारेवर धरण्याचे प्रदेश भाजपने याआधी जाहीर केले होते. मात्र, पक्षातच या मुद्दय़ावरून वादळे माजल्याने भाजपने आपल्या सरकारविरोधी संघर्षांची दिशा भ्रष्टाचाराऐवजी महागाईच्या मुद्दय़ावर केंद्रित केल्याचे स्पष्ट संकेत या मागणीतून मिळू लागले आहेत. आता भ्रष्टाचाराऐवजी राज्य व केंद्र सरकारच्या जनताविरोधी धोरणांच्या विरोधात व्यापक लढा देण्याचे पक्षाने ठरविले आहे, असे या बैठकीनंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. पक्षाची सदस्य नोंदणी मोहीम सुरू असून महाराष्ट्रात ३० लाख नवे सदस्य नोंदविण्यात आल्याची माहितीही मुनगंटीवार यांनी दिली. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष देऊन या समस्या सरकारने तातडीने सोडविल्या पाहिजेत, अशी मागणीही त्यांनी केली.