News Flash

मुंबईतील उद्यानाला टीपू सुलतानचे नाव देण्याची मागणी; भाजपाने ‘जनाबसेना’ म्हणत सेनेला डिवचलं!

गोवंडीतील एका उद्यानाला टिपू सुलतान नाव देण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आल्यानंतर त्यावर भाजपाकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे.

भाजपाची शिवसेनेवर खोचक टीका

राज्यात शिवसेना आणि भाजपा यांच्यात फाटाफूट झाल्यानंतर सेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करून सरकार स्थापन केलं. मात्र, तेव्हापासून शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये नेहमीच आरोप-प्रत्यारोप आणि राजकीय कलगीतुरा पाहायला मिळतो आहे. आता वरीष्ठ नेतेमंडळींप्रमाणेच स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांमध्ये देखील अशाच प्रकारचा राजकीय कलह पाहायला मिळू लागला आहे. गोवंडीमधल्या एका उद्यानाच्या नामकरणावरून शिवसेना आणि भाजपामध्ये वाद सुरू झाला असून शिवसेनेकडून करण्यात आलेल्या मागणीला भाजपाकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे. तसेच, यावरून शिवसेनेला ‘जनाबसेना’ म्हणून भाजपाकडून डिवचण्यात आलं आहे.

काय आहे वाद?

गोवंडीमधल्या एका उद्यानाला शिवसेनेच्या एम-पूर्व प्रभाग क्रमांक १३६ मधील नगरसेविकेने टिपू सुलतानचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली आहे. मात्र, त्यावर भाजपाकडून आक्षेप घेण्यात आला आहे. त्यासाठी भाजपाचे नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी बाजार व उद्यान समितीकडे एक पत्र लिहिलं आहे. हे पत्र ट्वीट करताना मुंबई भाजपाने शिवसेनेवर खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. “हिंदूंचा ज्याने क्रूर पद्धतीने छळ केला, अशा हिंदू द्वेष्ट्या टिपू सुलतानचे नाव वॉर्ड क्रमांक १३६ च्या उद्यानाला द्यावे, अशी शिवसेनेने मागणी केली आहे. जनाबसेनेच्या या चमत्कारिक मागणीविरोधात नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी बाजार व उद्या समितीला पत्र लिहिले आहे”, असं ट्वीट मुंबई भाजपाकडून करण्यात आलं आहे.

छत्रपतींपासून झाशीच्या राणीपर्यंत सर्वांचा विसर पडला का?

भाजपा नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी पत्रामध्ये शिवसेनेच्या मागणीवर आक्षेप घेतला आहे. “उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्याची शिफारस करताना प्रस्तावात टिपू सुलतान हे भारताचे क्रांती सेनानी होते. योग्य शासक, महान योद्धा, विद्वान असे वर्णन केले आहे. पण असे म्हणताता इंग्रजांविरुद्ध लढणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांपासून बाजीराव पेशव्यांपासून थेट झाशीच्या राणीपर्यंत सर्वांचा त्यांना विसर पडला आहे का? टिपू सुलतान हा धर्मांध, क्रूरकर्मा, अत्याचारी आणि हिंदू द्वेष्टा राजा होता”, अशी टीका या पत्रामध्ये करण्यात आली आहे. तसेच, या उद्यानाला मौलाना आझाद, अब्दुल कलाम, हवालदार अब्दुल हमीद यांची नावे देण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.

 

अजून किती लाचारी पत्करणार?

दरम्यान, याविषयी बोलताना “याआधी देखील छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घाटकोपर-मानखुर्द फ्लायओव्हरला हे नाव देण्याची मागणी आम्ही केली होती. त्याच पुलाला मोईनुद्दीन चिश्ती हे नाव ठेवण्याची मागणी करण्यात आली. आता तर हद्दच झाली. गोवंडीच्या गार्डनला टिपू सुलतान नाव देण्याचं शिवसेनेनं समर्थन केलं आहे. मतांसाठी, महाविकासआघाडीमध्ये राहण्यासाठी तुम्ही किती लाचारी पत्करणार? याचं उत्तर शिवसेनेला द्यावं लागेल”, अशी प्रतिक्रिया भालचंद्र शिरसाठ यांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2021 9:16 pm

Web Title: bjp objection on shivsena demand to name govandi garden as tipu sultan pmw 88
टॅग : Bjp,Bmc,Gardens,Shiv Sena
Next Stories
1 “वसुलीचा रिमोट कंट्रोलही शरद पवार आहेत का?”, भाजपा नेत्याचा खोचक टोला
2 खडसेंच्या जावयाला १९ जुलैपर्यंत ईडीची कोठडी
3 नितीन राऊतांचा खासगी कामासाठी सरकारी पैशातून विमान प्रवास; हायकोर्टाने मागितलं उत्तर
Just Now!
X