18 February 2019

News Flash

वीज मागणीचा अंदाज चुकलाच: भाजपची कबुली

राष्ट्रवादीला खुल्या चर्चेचे आव्हान

(संग्रहीत छायाचित्र)

राष्ट्रवादीला खुल्या चर्चेचे आव्हान

महावितरणने ऑक्टोबरमधील विजेच्या मागणीचा अंदाज काढला होता, पण थोडा चुकला. महावितरणने वीज मिळवण्यासाठी केलेल्या विविध उपायांमुळे आता केवळ ५०० मेगावॉट विजेचे भारनियमन सुरू आहे असे सांगत, राज्याच्या ऊर्जा खात्यावरील राष्ट्रवादी काँग्रेसचे आरोप भाजपने फेटाळून लावले. या विषयावर खुल्या चर्चेला या, असे आव्हानच भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिले.

महाराष्ट्राच्या वाटय़ाचा कोळसा विधानसभा निवडणुकींना सामोरे जाणाऱ्या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या भाजपशासित तीन राज्यांना देण्यात आला असून त्यामुळे राज्यात वीजटंचाई निर्माण झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेमध्ये केला. त्यानंतर विश्वास पाठक यांनी पत्रकार परिषद घेऊन मलिक यांचे आरोप फेटाळून लावले. राज्यात ऑक्टोबर हीटमुळे विजेची मागणी विक्रमी वाढली आहे. महावितरणने विविध उपाय केल्यामुळे सध्या केवळ ५०० मेगावॉटचा तुटवडा आहे.

‘बावनकुळे आणि पाठक यांच्याकडून वाटोळे’

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे वीज कंपन्यांमध्ये कंत्राटदार असून ऊर्जा खात्यातील चार कंपन्यांचे सल्लागार विश्वास पाठक यांनी महाराष्ट्राचे वाटोळे केले आहे. पाठक हे तरुण भारतमध्ये सीईओ म्हणून काम करत होते. छापखान्यात शाई आणि कागदाचा त्यांचा अभ्यास आहे. त्यांना कोळसा आणि विजेचा सल्लागार कसे करण्यात आले. त्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली असून पाठक यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली.

First Published on October 12, 2018 2:19 am

Web Title: bjp on electricity shortage