गेली १२ वर्षे वेगवेगळ्या कारणांसाठी कायम चर्चेत राहिलेले भायखळा येथील उद्यान या वेळी शुल्कवाढीमुळे पुन्हा एकदा वादा सापडले आहे. पेंग्विन पाहण्यासाठी एकीकडे मुंबईकरांची तुडुंब गर्दी होत असतानाच या उद्यानाच्या प्रवेश शुल्कवाढीच्या वादाने राजकीय वळण घेतले. पालिकेत सेनेसोबत सत्तासोबत करत असलेल्या भाजपने शुल्कवाढीला विरोध केला आहे.

पेंग्विनदर्शन खुले केल्यानंतर एप्रिलपासून वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयात पर्यटकांचा प्रचंड ओघ सुरू झाला. हजारो लोकांची गर्दी आवरण्यासाठी पालिकेला विशेष सुरक्षा व्यवस्था नेमावी लागली आहे. पेंग्विनच्या पिंजऱ्याचा खर्च व त्याची देखभाल यासाठी उद्यानाच्या प्रवेशशुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून दोन वेळा गटनेत्यांच्या बैठकीत मांडला गेला. त्यात लहान मुलांचे शुल्क दोन रुपयांवरून २५ रुपये तर प्रौढांचे शुल्क ५ रुपयांवरून १०० रुपये वाढवण्याचा विषय गटनेत्यांच्या बैठकीत चर्चिला गेला; मात्र या दोन्ही वेळा भाजपचे गटनेते अनुपस्थित होते. या विषयावर भाजपने कोणतेही मतप्रदर्शन त्यावेळी केले नव्हते. दरम्यानच्या काळात ‘सेव्ह राणी बाग फाउंडेशन’ने केवळ पेंग्विनसाठी उद्यानाचे प्रवेशशुल्क वाढवण्यास तीव्र विरोध दर्शवला. दीडशे वर्षांपूर्वी वसवलेल्या या उद्यानात अत्यंत दुर्मीळ झाडे आहेत.

ती पाहण्यासाठी सर्वसामान्यांवर वीसपट शुल्कवाढ लादणे अयोग्य असल्याचा मुद्दा समितीने लावून धरला. त्यासंबंधी सर्व राजकीय पक्षांना पत्रेही लिहिली. स्थायी समितीत हा प्रस्ताव आता चर्चेला येणार असताना भाजपने या प्रस्तावाला विरोध असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे या प्रकरणाने राजकीय वळण घेतले आहे.

सत्तेत सहभागी असलेल्या भाजपच्या विरोधामुळे शुल्कवाढीचा प्रस्ताव मंजूर करणे सेनेसाठीही जड जाणार आहे.

पेंग्विन सांभाळण्याचा खर्च जास्त आहे. मुंबई पालिका ज्येष्ठ व्यक्तींना, पालिका विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देत आहे. चौघांच्या कुटुंबाला अवघ्या १०० रुपयांमध्ये प्रवेश आहे. आज उद्यानाला भेट देणाऱ्यांमध्ये ३० टक्के ज्येष्ठ नागरिक आहेत. एवढी सवलत दिल्यानंतर शुल्कवाढ करणे अपरिहार्य  असल्याचे मत पालिका अधिकाऱ्याने व्यक्त केले.

सेव्ह राणी बाग फाउंडेशनच्या शुभदा निखार्गे म्हणाल्या की  राणीबाग साधारण ५० एकर जागेत आहे. देशात चेन्नई, कोलकाता येथील प्राणीसंग्रहालये दीडशे ते दोनशे एकर जागेत आहेत. मात्र त्यांना ३० रुपये शुल्क परवडते. मग मुंबईतच ५ रुपयांवरून १०० रुपये शुल्कवाढ करण्याची गरज काय? वृद्ध वा पालिका शाळेचे विद्यार्थी हा अगदी मर्यादित वर्गाला दिलेल्या सवलतीचा बाऊ करण्यात अर्थ नाही. त्याचप्रमाणे तिघांच्या कुटुंबालाही सवलत देत नाही.

सेनेने भायखळा उद्यानात पेंग्विन आणायचे ठरवले तेव्हाही काहींनी विरोध केला होता, मात्र पेंग्विन आल्यावर हीच मंडळी त्यांचे दर्शन घ्यायला रांगेत पुढे उभी राहिली होती. आता हजारो लोक पेंग्विन पाहायला येत आहेत, गर्दीवर नियंत्रण ठेवावे लागत आहे. या पेंग्विनची काळजी घेण्यासाठी शुल्कवाढ आवश्यक आहे.

– रमेश कोरगावकर, अध्यक्ष   स्थायी समिती

पालिकेकडे ६१ हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. दरवर्षी त्यावर साडेचार हजार कोटी रुपये व्याज मिळते. मग भायखळा उद्यानात केवळ पेंग्विन आणले म्हणून सामान्य मुंबईकरांच्या माथी शुल्कवाढ का  लादायची? या उद्यानात इतर कोणत्याही सुविधा न देता केवळ वाढणारी गर्दी पाहून शुल्कवाढ करण्याच्या निर्णयाला भाजपचा विरोध आहे.

– मनोज कोटक, भाजप गटनेता