समाजवादी पार्टीला हाताशी धरून शिवसेनेने हॉटेल इमारतीची गच्ची पार्टीसाठी खुली करून देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्याचा घाट सुधार समितीच्या बुधवारच्या बैठकीत घातला होता. मात्र भाजपने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेच्या मदतीने शिवसेनेचा हा डाव उधळून लावला. शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या कल्पनेतून साकारलेल्या गच्चीतील पार्टीचा प्रस्ताव मतदानाअंती फेटाळण्यात आल्याने  शिवसेनेवर नामुष्की ओढवली आहे.
‘नाइट लाइफ’बरोबरच मुंबईतील हॉटेल इमारतींच्या गच्चीवर पार्टी करण्यास पालिकेने परवानगी द्यावी, अशी कल्पना आदित्य ठाकरे यांनी मांडली होती.
प्रशासनाला हाताशी धरून शिवसेना नेत्यांनी याबाबतचा प्रस्ताव यापूर्वी दोन वेळा सुधार समितीच्या बैठकीत सादर केला. मात्र आसपासच्या इमारतींमधील रहिवाशांना होणारा त्रास, सुरक्षितता आदी प्रश्न उपस्थित करीत भाजपने या प्रस्तावास सुरुवातीपासून विरोध केला होता. सुधार समितीच्या बुधवारच्या बैठकीत पुन्हा हा प्रस्ताव चर्चेला आला.   
सुधार समिती अध्यक्षा उज्ज्वला मोडक यांनी या प्रस्तावावर मतदान घेण्याचा निर्णय घेतला. मतदानादरम्यान समाजवादी पार्टीने शिवसेनेला साथ दिली. पण भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेने विरोधात मतदान केल्यामुळे हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. भाजपने दिलेल्या धक्क्यामुळे शिवसेना नगरसेवक खवळले आहेत. आता एलईडीच्या प्रस्तावावरून भाजपची कोंडी करण्याची व्यूहरचना शिवसेना आखत आहे.
समाजवादी पार्टीशी हातमिळवणी
समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांचे पुत्र फरहान आझमी यांनी मंगळवारी पालिका मुख्यालयात शिवसेना नेत्यांची भेट घेतली. हॉटेलच्या गच्चीवरील पार्टीस परवानगी मिळावी यासाठी फरहान आझमी यांनी शिवसेना नेत्यांशी चर्चा केली होती.  तसेच त्यांनी उज्ज्वला मोडक यांची भेट घेऊन याबाबतच्या प्रस्तावास मंजुरी मिळावी अशी इच्छाही व्यक्त केली होती. समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव सादर होताच एके काळी कट्टर विरोधक असलेले समाजवादी पार्टीचे नगरसेवक शिवसेनेच्या मदतीला धावले. त्यामुळे समाजवादी पार्टीशी शिवसेनेने केलेली हातमिळवणी उघडकीस आली.