News Flash

नाना पटोलेंचं आंदोलन राज्य सरकारच्याच विरोधात – देवेंद्र फडणवीस

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोलेंच्या सायकल रॅली आंदोलनावर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे.

संग्रहित छायाचित्र

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांचा निषेध करण्यासाठी सायकल रॅली काढली. यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. मात्र, या रॅलीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. “राज्य सरकारने पेट्रोलवर २७ रुपये टॅक्स लावला आहे. नाना पटोलेंचं आंदोलन हे राज्य सरकारच्या टॅक्सविरोधातच असावं. गुजरात किंवा इतर राज्यांप्रमाणे १० रुपयांनी पेट्रोल दर कमी करण्यात आले आहेत, तशाच प्रकारे महाराष्ट्रात देखील दर कमी करावेत, यासाठीच त्यांनी हे आंदोलन केलं असावं”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

मीडिया इव्हेंट करावाच लागणार!

दरम्यान, यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोलेंच्या आंदोलनाला काँग्रेसचा मीडिया इव्हेंट असं म्हणून टोला लगावला आहे. “अजित पवार अर्थसंकल्प मांडताना पेट्रोलवरचे राज्य सरकारचे काही टॅक्स कमी करून दर कमी करणार आहेत असं दिसतंय. त्यामुळे त्याचं श्रेय घेण्यासाठी काँग्रेसकडून आधीच हा सायकल मोर्चा काढण्यात आला. पण राज्यात विरोधी पक्षाची जागा काँग्रेसला घेता येणार नाही. काँग्रेसचं देशातही विरोधी पक्ष म्हणून स्थान नाही. एकूणच काँग्रेसची अवस्था केविलवाणी आहे. या अवस्थेत त्यांना मीडिया इव्हेंट करावा लागणारच. तो ते करत आहेत”, असा टोला फडणवीसांनी लावला.

कोणत्या मुद्द्यांवर अधिवेशन गाजणार?

करोना काळानंतर राज्य सरकारचं हे पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी सरकारला घेरण्याची पूर्ण तयारी केली आहे. याविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मुळात वीजबिलांचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. वीज कनेक्शन कट करण्याची मोहीम कधीच महाराष्ट्रात घडली नाही. ही मोगलाई आहे. शेतकऱ्यांना घोषित झालेली आर्थिक मदत मिळालेली नाही. कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर देखील आम्ही सरकारला घेरण्याचा प्रयत्न करू”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2021 11:58 am

Web Title: bjp opposition leader devendra fadnavis slams nana patole cycle rally before maharashtra budget session 2021 pmw 88
Next Stories
1 मुंबईत आजपासून रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ
2 चेंबूरमध्ये करोना रुग्णावर गुन्हा दाखल
3 बालसंगोपन योजनेच्या अनुदानात वाढ
Just Now!
X