सत्तेत आल्यापासून भाजपकडून मिळणाऱ्या दुर्लक्षित वागणुकीमुळे नाराज असणाऱ्या महायुतीतील मित्रपक्षांच्या प्रमुखांच्या मुंबईतील बैठकीला सुरूवात झाली आहे. वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. मात्र, या बैठकीपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांमुळे महायुतीच्या अस्तित्वाविषयीच शंका उपस्थित झाली आहे. दुष्काळ, गारपीट आणि ऊसाच्या प्रश्नावरून सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एमआयजी क्लबबाहेर महायुतीमधून बाहेर पडण्याच्या घोषणा दिल्या. त्यामुळे राजू शेट्टी कार्यकर्त्यांचा हा सल्ला मानणार का आणि भविष्यात महायुती टिकणार की नाही, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींनी अनेकदा जाहीरपणे सरकारविरोधी भूमिका घेतली आहे. मात्र, आता शेट्टींबरोबर इतर मित्रपक्षही महायुतीला अलविदा करणार का, हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल. या बैठकीला राजू शेट्टी, महादेव जानकर, विनायक मेटे आणि रामदास आठवले उपस्थित आहेत.