मुंबईकरांसाठी नेमेचि येतो पावसाळा प्रमाणेच नेमेचि तुंबते मुंबई असं म्हणण्याची वेळ नुकत्याच झालेल्या पहिल्याच पावसाने आणली. दरवर्षी मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचतं आणि मुंबईकरांची ससेहोलपट होते. यंदाही तेच दृश्य दिसल्यानंतर विरोधी पक्षात असलेल्या भाजपाकडून सत्ताधाऱ्यांना टिकेचे कडू डोस पाजले जात आहेत. मात्र, त्यावर शिवसेनेकडूनही उलट आरोप होऊ लागल्यानंतर भाजपानं आपला विरोध अधिक खोचक केला आहे. भाजपाचे आमदार आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मुंबईत पाणी साठल्यावरून केंद्रावर टीका करणाऱ्या शिवसेनेला खोचक शब्दांमध्ये टोला हाणला आहे. शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केलेल्या एका विधानावरून त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

आलं अंगावर की ढकललं केंद्रावर!

राहुल शेवाळे यांनी मुंबईची तुंबई होण्याला केंद्र सरकारला जबाबदार धरल्यानंतर प्रविण दरेकरांनी त्यावर टोला लगावला आहे. “यांचं म्हणजे ना… नाचता येईना अंगण वाकडं, रांधता येईना ओली लाकडं! स्वत:चं अपयश झाकण्यासाठी आलं अंगावर की ढकललं केंद्रावर!”, अशा शब्दांत प्रविण दरेकर यांनी ट्विटरवरून खोचक टीका केली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये मुंबईत झालेल्या पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचून मुंबईकरांचं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. सगळ्याच महत्त्वाचं म्हणजे मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल देखील ट्रॅक्सवर पाणी साचल्यामुळे काही काळ बंद ठेवावी लागल्यामुळे यावर मुंबईकरांची तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.

pravin darekar tweet
प्रविण दरेकरांचा शिवसेनेवर निशाणा

Photo : करोनाशी लढणाऱ्या मुंबईला पावसाने झोडपलं

हिंदमाता पुन्हा जलमय!

दरम्यान, यासंदर्भात मुंबई महानगर पालिकेमध्ये सत्तेत असलेल्या शिवसेनेचे मुंबईतील खासदार राहुल शेवाळे यांनी या सर्व प्रकाराचं खापर केंद्र सरकारवर फोडलं आहे. गेल्या तीन महिन्यांपासून हिंदमाता परिसरामध्ये अंडरग्राउंड ड्रेनेज टनेलची परवानगी मागितली जात असतानाही केंद्राकडून ती दिली गेली नाही. यासाठी केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप राहुल शेवाळे यांनी केला आहे. त्याच मुद्द्याला धरून प्रविण दरेकर यांनी हे खोचक ट्वीट केलं आहे.

मुंबई व उपनगरमध्ये पुढील ४८ तासात अतिमुसळधार पावसाची शक्यता!

मुंबईत तूर्तास निर्बंधांमध्ये शिथिलता नाही

मुंबईकरांना एकीकडे वरून धो धो कोसळणारा पाऊस आणि पायाखाली साचणारं पाणी याचा सामना करावा लागत असताना दुसरीकडे करोनाविषयक निर्बंधांमधूनही मुंबईकरांना दिलासा मिळालेला नाही. राज्य सरकारच्या नियमावलीनुसार पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांच्या खाली आणि ऑक्सिजन बहेड ऑक्युपन्सी २५ टक्के ते ४० टक्क्यांच्या दरम्यान असल्यास दुसऱ्या गटासाठी असलेली नियमांमधली सूट लागू करता येऊ शकते. मात्र, मुंबई महानगर पालिकेने मुंबईत पुढील आदेश येईपर्यंत तिसऱ्या गटाचेच निर्बंध लागू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.