मुंबई : सरकारचा मराठा आरक्षणासंदर्भात कोणताही निर्णय नाही. मराठा आरक्षणाबाबतीत भाजपने जी भूमिका घेतली होती, तीच भूमिका आज सरकार मराठा आरक्षणासंदर्भात घेत नाही. तसेच भाजप सरकारच्या काळात मराठा समाजाला आरक्षण देताना भाजपने सामाजिक संतुलन राखले होते, पण ते या सरकारकडून राखल्याचे दिसत नाही, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज केली.

भाईंदर येथे भाजप वैद्यकीय आघाडी प्रशिक्षण शिबिरात ‘महाराष्ट्रातील सध्याचे राजकारण’ या विषयावर दरेकर यांनी मार्गदर्शन केले. दरेकर म्हणाले की, राज्यातील विकासाचा बोजवारा उडाला असून सामाजिक संतुलन बिघडले आहे.

मराठा आरक्षण देताना आमच्या सरकारने ओबीसी समाज, धनगर समाजाची काळजी घेतली होती, सामाजिक संतुलन राखले होते. हीच भूमिका सरकार का घेत का नाही, असा सवालही दरेकर यांनी केला.

करोनासारख्या संकटाच्या काळात भाजपच्या वैद्यकीय आघाडीने युद्धपातळीवर काम केले.  सहभागी डॉक्टर व अन्य पदाधिकाऱ्यांनी करोनाच्या काळात केलेल्या कामामुळे हजारोंना जीवदान मिळाले, या शब्दात दरेकर यांनी आघाडीच्या कार्याचा गौरव केला.

याप्रसंगी डॉ. अजित गोपछेडे, डॉ. बाळासाहेब हरपडे, डॉ. स्वप्निल मंत्री, डॉ. उज्ज्वला हाके, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. राहुल कुलकर्णी, डॉ. मेघना चौघुले, डॉ. अनुप मगर, डॉ. विकी, डॉ. गोविंद भताने उपस्थित होते.