मुंबई : करोनाबाधित रुग्णांच्या निमित्ताने केलेला खर्च, रुग्णांना रुग्णालयात उपलब्ध होत नसलेल्या खाटा, नालेसफाईचा उडालेला फज्जा आदी विविध मुद्दय़ांवरून मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला अडचणीत आणण्याची तयारी भाजपने केली आहे. त्यासाठी लवकरात लवकर पालिका सभागृहाची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेण्याचा आग्रह भाजपने धरला असून त्यासाठी महापौरांना पत्र पाठविण्यात आले आहे.

मुंबईमध्ये सातत्याने करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्यांसाठी करोना काळजी केंद्र, समर्पित करोना आरोग्य केंद्र आदींची पालिकेने उभारणी केली आहे. मृतदेह बंदिस्त करण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या शव पिशव्या खरेदी करण्यात आल्या. करोनाविषयक खर्चामधील तफावतीबाबत भाजपकडून सातत्याने पालिका प्रशासन आणि शिवसेनेवर टीका करण्यात येत आहे. मुंबईत मुसळधार पाऊस पडू लागताच सखलभाग जलमय होऊन मुंबईकरांना फटका बसत आहे. या संदर्भात जाब विचारता यावा यासाठी पालिका सभागृहाची बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आयोजित करावी, अशी मागणी भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्र पाठवून केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियमित बैठका घेणे बंधनकारक आहे. या बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून नियमित घ्याव्या, असे पत्र नगरविकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांना पाठविले आहे. त्यानुसार सभागृहाची बैठक घ्यावी, अशी मागणी शिंदे यांनी केली.