भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आज रात्री अचानक मुंबई दौऱ्यावर येणार असल्याचं वृत्त आहे. पक्षाच्या संघटनात्मक बैठकीसाठी अमित शाह मुंबईत येणार असून विले पार्ले येथे बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. गेले अनेक दिवसांपासून राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असल्याने अमित शाह यांच्या या दौऱ्याला वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे.

सोमवारी मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेण्यासाठी गेले होते, मात्र अमित शाह निवडणूक प्रचार दौऱ्यावर होते त्यामुळे ही भेट तेव्हा झाली नव्हती. त्यामुळे आज मुख्यमंत्री आणि अमित शाह यांच्यात न झालेली बैठक होणार असल्याची माहिती आहे. आजच्या मुंबई भेटीत अमित शाह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. प्रदीर्घ काळापासून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला आहे. ठराविक कालावधीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होत असते. पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा मंत्रिमंडळात समावेश करुन त्यांचे पुनर्वसन करण्याबाबतही चर्चा होऊ शकते. या बैठकीत मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेची नाराजी कमी करण्यासाठी काय करता येईल यावरही चर्चा होऊ शकते.