निलेश राणेंच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह

मुंबई : मी भाजपचा खासदार असलो तरी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून आपले पुत्र निलेश महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे निवडणूक लढवतील, असे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी जाहीर केले असले तरी त्यांच्या मुलाने निवडणूक लढवू नये, यासाठी भाजपच्या नेतृत्वाने दबाव आणला आहे. यामुळे राणे कोणती भूमिका घेतात, याविषयी उत्सुकता आहे.

दरम्यान, राणे यांची भूमिका लक्षात घेता हा मतदारसंघ राष्ट्रवादीला न सोडता काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला आहे. राणे आणि शिवसेना यांच्यातून विस्तवही जात नाही. युती झाल्याने रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ शिवसेनेकडे कायम राहणार, हे स्पष्ट झाले. युती झाल्यावर राणे यांनी, आपले पुत्र निलेश महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातून लढतील, असे जाहीरही केले होते. राणे शिवसेनेच्या विरोधात लढतील हे लक्षात घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वेगळी चाल रचली. हा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. राणे आणि काँग्रेस यांचे संबंध लक्षात घेता राणेपुत्राला मदत करणे काँग्रेसला शक्य झाले नसते. यामुळेच हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडावा आणि आघाडीने राणे यांच्या पुत्राला मदत करावी, अशी रणनीती होती.

राणे यांनी शिवसेनेच्या विरोधात उमेदवार उभा केल्यास त्यातून युतीत चुकीचा संदेश जाऊ शकतो. कारण राणे भाजपचे खासदार असून, ते पक्षाच्या जाहीरनामा समितीचे सदस्यही आहेत. राणे आणि शिवसेनेत सख्य होणे अशक्यच. पण त्यांनी मुलाला उभे करू नये, असा भाजपचा प्रयत्न आहे. या दृष्टीने भाजपने राणे यांच्यावर दबाव आणला आहे. भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने राणे यांना तसे बजावल्याचे समजते. राणे यांचे अलीकडचे, ‘आपण भाजपप्रणीत रालोआचे सदस्य आहोत’ हे विधान बोलके आहे याकडे भाजपनेते लक्ष वेधत आहेत.

राणे ऐनवेळी माघार घेऊ शकतात, हे लक्षात घेऊनच काँग्रेसने नवीनचंद्र बांदिवडेकर यांची उमेदवारीही जाहीर केली. दरम्यान, राणेंना पाठिंबा देण्याचा प्रश्नच नव्हता, असे काँग्रेस खासदार हुसेन दलवाई यांनी स्पष्ट केले आहे.

नारायण राणे भाजपचे खासदार असून, ते पक्षाच्या निर्णयाशी बांधील राहतील.

-चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री