लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : ई-निविदा प्रक्रियेत भायखळा परिसरातील कामे मिळविणाऱ्या कंत्राटदाराला स्थायी समिती अध्यक्षांनी मोबाइलवरून धमकावल्याच्या प्रकरणाचे पडसाद शुक्रवारी पालिका मुख्यालयात उमटले. स्थायी समितीच्या बैठकीत याबाबत हरकतीचा मुद्दा उपस्थित करण्यास अध्यक्षांनी संधी न दिल्यामुळे खवळलेल्या भाजपच्या नगरसेवकांनी सत्ताधारी शिवसेना व स्थायी समिती अध्यक्षांच्या विरोधात घोषणाबाजी करीत पालिका मुख्यालय दणाणून सोडले.

भायखळा परिसरातील ‘ई’ विभाग कार्यालयाच्या हद्दीतील प्रभागामधून स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव निवडून आले आहेत. विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पत्नी भायखळा मतदारसंघातून वियजी झाल्या आहेत. जाधव यांच्या प्रभागातील १४ कामांच्या ई-निविदा काढण्यात आल्या होत्या. ही सर्व कामे एका कंत्राटदाराला मिळाली आहेत. कंत्राटदाराने ही कामे सोडावी यासाठी यशवंत जाधव यांनी मोबाइलवरून संपर्क साधून दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. उभयतांमध्ये झालेल्या संभाषणाच्या ध्वनिचित्रफितीची जोरदार चर्चा पालिकेत सुरू आहे. या प्रकरणी कंत्राटदाराने पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि पोलीस आयुक्तांकडे जाधव यांच्या विरोधात तक्रार केली आहे.

स्थायी समितीच्या शुक्रवारच्या बैठकीत भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी या प्रष्टद्धr(२२४)नाला वाचा फोडण्यासाठी हरकतीचा मुद्दा उपस्थित करण्याचा निर्णय घेतला होता. बैठक सुरू होताच त्यांनी अध्यक्षांकडे परवानगी मागितली. परंतु बैठकीच्या शेवटी विषय घेता येईल असे सांगत अध्यक्षांनी वेळ मारून नेली. बैठक संपत आल्यानंतरही हरकतीचा मुद्दा उपस्थित करण्यास अध्यक्षांनी परवानगी नाकारल्याने प्रभाकर शिंदे आणि भाजपचे नगरसेवक संतप्त झाले.

बैठक संपताच भाजप नगरसेवकांनी स्थायी समिती अध्यक्षांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करीत घोषणा देत पालिका मुख्यालय दणाणून सोडले. सभागृह नेत्या विशाखा राऊत आणि शिवसेना नगरसेविका राजुल पटेल यांनी भाजप नगरसेवकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती करून चर्चेच्या माध्यमातून प्रष्टद्धr(२२४)न सोडविण्याचे आवाहन केले. मात्र भाजप नगरसेवक आंदोलन मागे घेण्यास तयार नव्हते.

प्रशासनाची कारवाई काय?

स्थायी समिती अध्यक्ष महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करू देत नाहीत. चर्चेविनाच प्रस्तावांना घाईघाईत मंजुरी दिली जाते. ते मनमानी कारभार करीत आहेत. कंत्राटदाराने त्यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीवर प्रशासनाने कोणती कारवाई केली. या प्रकरणाची चौकशी सुरू केली का, असा प्रष्टद्धr(२२४)न प्रभाकर शिंदे यांनी उपस्थित केला आहे. भाजप नेत्यांच्या ध्वनिचित्रफिती आपल्याकडे आहेत, असा दावा स्थायी समिती अध्यक्ष करीत आहेत. त्यांनी त्या जाहीर कराव्या, असे आव्हान शिंदे यांनी केले.