राफेल मुद्द्यावर मोदी सरकारला क्लिन चीट मिळाल्यानंतर भाजपाने शनिवारी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात आंदोलन केलं. तसंच याप्रकरणी राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपाच्यावतीनं करण्यात आली आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयानं ‘चौकीदार चोर है’ या वक्तव्यावरुन राहुल गांधी यांना फटकारलं होतं. तसंच पुढील काळात सांभाळून वक्तव्य करण्याच्या सुचनाही न्यायालयाने दिल्या.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर काँग्रेस आणि राहुल गांधी यांचा पर्दाफाश झाला आहे. त्यामुळे त्यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भाजपा महासचिव भूपेंद्र यादव यांनी केली होती. गुरूवारी न्यायालयानं राफेल विरोधातील सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्या. सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित प्रकरणांवर कोणत्याही प्रकारचं राजकीय भाष्य करताना काळजी घ्या असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना दिला. दरम्यान राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींविषयी केलेल्या विधानावरुन मागितलेली माफी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली. तसंच भाजपा खासदार मीनाक्षी लेखी यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल केलेला अब्रुनुकसानीचा खटला सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला.

लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी राफेल कराराच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींवर टीका करताना ‘चौकीदार चोर है’ म्हटलं होतं. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयानंतर राहुल गांधी यांनी आता सर्वोच्च न्यायालयानेही ‘चौकीदार चोर है’ मान्य केल्याचा दावा केला होता. यानंतर भाजपा खासदार मीनाक्षी लेखी यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली असून सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधीचं वक्तव्य खेदजनक असल्याचं सांगत माफी मान्य केली होती.