सत्तेचे सर्व फायदे उपभोगून मित्रपक्षावर कडवी टीका करणाऱ्या शिवसेनेवर भाजपनेही प्रतिहल्ला चढवला असून, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना कधी काडीमोड घेताय, असा थेट प्रश्न विचारण्यात आला आहे. भाजपचे पाक्षिक ‘मनोगत’मध्ये पक्षाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी लिहिलेल्या लेखामध्ये शिवसेनेला टोमणे मारत खडे बोल सुनावण्यात आले आहेत. शिवसेनेसोबतची युती टिकवण्यासाठी भाजपने मागच्या काही दशकांमध्ये केलेल्या त्यागाची आठवणही भंडारी यांनी आपल्या लेखामधून करून दिली आहे.
संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये पक्षाच्या कार्यक्रमात सध्याच्या सरकारची तुलना निजामाच्या राजवटीशी केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना लेखात लिहिण्यात आले आहे की, ‘निजामा’नेच वाढलेली बिर्याणी एका हाताने खाताना दुसऱ्या हाताने ते आमच्यावर टीका करतात. त्यांना आम्ही केंद्रात आणि राज्यात मंत्रिपदे दिली आहेत. ‘निजामा’ने दाखवलेल्या दातृत्त्वामुळेच ते सर्व सोयीसुविधा उपभोगत आहेत आणि भाजपलाच शाप देत आहेत. यालाच उपकारांची जाणीव नसणे, असे म्हणतात.
‘निजामा’सोबत आपण नांदत आहोत, असे त्यांना वाटत असेल, तर ते सत्तेतून बाहेर का नाही पडत? असा प्रश्नही विचारत त्याचवेळी तेवढे धैर्य शिवसेना दाखवणार नाही, असा टोमणा लेखात मारण्यात आला आहे.
राज्यात शिवसेनेची ताकद कमी होत चालली असून, हे वास्तव पचवणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना जड जात असल्याने त्यांना नैराश्य आले आहे. त्यांनी आता बदललेली परिस्थिती समजून घेतली पाहिजे आणि आमच्यावर करण्यात येणारी टीका थांबवली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.