17 January 2021

News Flash

भाजपा नेते राम कदम मुंबई पोलिसांच्या ताब्यात

राम कदम यांच्याकडून जनआक्रोश यात्रेचं आयोजन

भाजपा नेते राम कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पालघर गडचिंचले हत्याकांड प्रकरणी राम कदम यांनी जनआक्रोश यात्रेचं आयोजन केलं होतं. राम कदम यांच्या निवासस्थानापासून यात्रेला सुरुवात होणार होती. यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मात्र राम कदम समर्थकांसोबत पालघरच्या दिशेने निघण्यासाठी बाहेर येताच त्यांच्यावर कारवाई करत ताब्यात घेतलं. “हा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु असून दुर्दैवी असल्याची,” प्रतिक्रिया राम कदम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.

राम कदम यांनी बुधवारी सकाळी ८.३० वाजता खार येथील आपल्या निवासस्थानापासून ते पालघरमधील हत्याकांड झालेल्या घटनास्थळापर्यंत जनआक्रोश यात्रा काढणार असल्याचं जाहीर केलं होतं. पालघर हत्याकांडाला २११ दिवस होऊनही अद्याप कारवाई न करण्यात आल्याच्या निषेधार्थ ही यात्रा काढण्यात येणार होती. राम कदम यांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणीदेखील केली आहे.

आणखी वाचा- हा संघर्ष थांबणार नाही, येणाऱ्या काळात लोकं रस्त्यावर उतरणार – राम कदम

मुंबई पोलिसांनी सकाळपासून राम कदम यांच्या निवासस्थानाबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. पोलिसांचा मोठा फौजफाटा यावेळी हजर होता. राम कदम यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात येथे जमा झाले होते. यावेळी ‘भारत माता की जय’ ची घोषणाबाजी केली जात होती. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलिसांनी कारवाई करत राम कदम आणि त्यांच्या काही समर्थकांना ताब्यात घेतलं आहे.  यावेळी त्यांनी हा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु असून दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.

१६ एप्रिलच्या रात्री सुरतकडे निघालेल्या दोन साधू व त्यांच्या चालकांची गडचिंचले येथे जमावाकडून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी १५४ जणांना अटक केली असून ११ अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तसंच पाच पोलिसांना निलंबित करण्यात आलं असून ३० हून अधिक बदल्या करण्यात आल्या आहेत. पालघरमधील घटनेनंतर राज्यासह देशभरात संताप व्यक्त करण्यात आला होता. सोबतच राज्य सरकारवर टीका होऊ लागली होती. यानंतर या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2020 9:45 am

Web Title: bjp ram kadam janakrosh yatra palghar lyncihg sgy 87
Next Stories
1 प्रार्थनास्थळांकडे ओघ सुरू
2 छटपूजेवर र्निबध
3 सागरी किनारा मार्गासाठी प्रवाळ स्थानांतरण पूर्ण
Just Now!
X