रेल्वेच्या कार्यक्रमात राजकीय भाषणबाजी

मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी पद्धतशीरपणे तयारी करणाऱ्या भाजपने आपल्या केंद्रातील सत्तेचा आधार घेत मुंबईतील उत्तर भारतीयांची मते लाटण्यासाठी रविवारी रेल्वेच्या कार्यक्रमाचा उत्तम उपयोग केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रतिमांचे उदात्तीकरण करत मुंबईच्या आणि मुंबईतील उत्तर भारतीयांच्या विकासासाठी भाजपच कसा कटिबद्ध आहे, हे ठसवण्यासाठी उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार जगदंबिका पाल आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित होते. वांद्रे टर्मिनस येथे झालेल्या या कार्यक्रमात पाल यांनी उत्तर प्रदेशातील अनेक मागण्या जाहीरपणे रेल्वेमंत्र्यांसमोर ठेवल्या.

केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या रेल्वे मंत्रालयाच्या कोणत्याही कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधींना मानाचे आमंत्रण असते, मात्र रविवारी रेल्वेने वांद्रे टर्मिनस येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी वांद्रे मतदारसंघाच्या खासदार पूनम महाजन उपस्थित नव्हत्या आणि उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार जगदंबिका पाल आपल्या पाठीराख्यांसह कार्यक्रमस्थळी हजर होते. एवढेच नाही, तर रेल्वे अधिकाऱ्यांनी अनेकदा विनंत्या करूनही पाल यांनी रेल्वेमंत्र्यांच्या आगमनाआधीपासूनच संपूर्ण कार्यक्रमाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांत केलेल्या कामांचा पाढा पाल यांनी वाचला. त्यानंतर रेल्वेमंत्री म्हणून सुरेश प्रभू यांनी केलेल्या कार्यक्रमांची जंत्री त्यांनी सादर केली. एवढय़ावरच न थांबता, ‘मुंबईतील उत्तर भारतीयांचा विकास साधायचा असेल, तर मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपलाच मते द्या’, असे आवाहन करण्यापर्यंत पाल यांची मजल गेली. अखेर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू वांद्रे टर्मिनस येथे आल्यावर रेल्वेच्या सूत्रसंचालकांना पाल यांना आवर घालावा लागला.

  • या कार्यक्रमादरम्यान रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीही गोरखपूरपासून सुरू होणाऱ्या नव्या मार्गिका, गोरखपूर येथे विद्युत इंजिनासाठीचा कारखाना आदी उत्तर प्रदेशातील विविध प्रकल्पांच्या घोषणा प्रभू यांनी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात केल्या. त्यामुळे कार्यक्रम नेमका कुठे चालू आहे, अशी शंका उपस्थितांनी बोलून दाखवली.
  • काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई आणि भाजपचे राज्यातील शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी कोकणसाठी आणखी काहीतरी करा, असे सांगण्याचा प्रयत्न केला. पण कोकणातील विकासकामे चालूच असल्याचे प्रभूंतर्फे त्यांना सांगण्यात आले.