भाजपचे आरोपाला प्रत्युत्तर

सत्ताकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या मनातील जातीय विद्वेषातून गेल्या दोन-तीन वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत:च महाराष्ट्रात जाती-पातीच्या राजकारणातून समाजात फूट पाडत आहेत. आपल्याच राजकारणाचे वर्णन करताना ते नाव मात्र भाजपचे घेत आहेत, असा प्रतिहल्ला भाजपने चढवला आहे.

मराठा आरक्षणावरून देवेंद्र फडणवीस सरकार समाजामध्ये फूट पाडत असल्याचा आरोप पवार यांनी केला होता. त्यावर भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी उत्तर दिले आहे.  पवार यांचा आरोप बिनबुडाचा आहे. उलट आपल्या  प्रतिस्पर्ध्याची जात काढण्याची व त्यातून जातीय विद्वेष पसरवण्याचे पवारांचे राजकारण जुने आहे.

जोशी आडनावाचा माणूस शेतकऱ्यांचा नेता असतो का? असा सवाल करत शरद जोशी यांची जात पवारांनी काढली होती. ऊस आंदोलनावरून खासदार राजू शेट्टी यांची जात काढली. कोल्हापूरच्या छत्रपती संभाजी महाराजांना खासदारकी मिळाली तेव्हा छत्रपती आणि पेशवे असे उदाहरण देऊन पवारांनी फडणवीस यांची जात काढली. हे महाराष्ट्र विसरलेला नाही. इतरांच्या जाती काढून समाजात विद्वेष पसरवण्याचे  उद्योग करणारे शरद पवार हे भाजपवर आरोप करतात याच्या इतका मोठा विनोद नाही, असा टोला माधव भांडारी यांनी लगावला.