काँग्रेसची टीका

मुंबई : मराठा आरक्षणाच्या नावाने राज्यभर आंदोलन करण्याचा भाजपचा निर्णय म्हणजे मराठा आरक्षणाच्या वाटेत काटे टाकण्याचा हा कुटिल डाव आहे, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. संजय लाखे-पाटील यांनी केली.

मराठा आरक्षणप्रश्नी भाजप राजकारण करत असून एसईबीसी कायद्यातील त्रुटी, घटनात्मक अडथळे दूर करत मराठा आरक्षणाला न्याय मिळवून देण्याऐवजी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात गावोगाव आंदोलन करून स्वत:च्या घोडचुका झाकून ठेवण्याचा हा प्रकार आहे, असे ते म्हणाले. विनायक मेटे, नरेंद्र पाटील हे मराठा समाजाला राज्य सरकारच्या विरोधात भडकावण्याच्या आंदोलनाचे नियोजन करणार आणि भाजप त्यांना रसद पुरवणार हा, हे त्यांचे धोरण ठरलेले असे लाखे-पाटील यांनी सांगितले.

मराठा समाजाला खरेच आरक्षण मिळावे अशी भाजपची भूमिका असेल तर संसदेचे खास अधिवेशन बोलवावे आणि राज्याचे अधिकार काढून घेणारी १०२ वी घटनादुरुस्ती तातडीने रद्द करावी, कालबाह्य़ झालेल्या इंद्रा सहानी खटल्यातील ५० टक्के आरक्षणमर्यादेची अट काढून टाकावी, एसईबीसी कायद्याला संसदेच्या दोन्ही सभागृहांचे बहुमताने संरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

मराठा आरक्षणाशी संबंधित वरील तीन मुद्दे हे केंद्र सरकार आणि संसदेच्या अधिकारात आहेत, राज्य सरकारच्या नाहीत. त्यामुळे राज्यात मोर्चे काढण्याचा भाजपचा कुटिल डाव, मराठा समाज आणि राज्यातील जनता पुरती ओळखून आहे, असे लाखे-पाटील यांनी म्हटले आहे.