कल्याण-डोंबिवलीत सत्तेतील भागीदाराचा शोध सुरू
कल्याण-डोंबिवली महापालिकेत सत्ता काबीज करण्यासाठी भाजप-शिवसेना दोघांनीही मोर्चेबांधणी सुरू केली असून शक्यतो परस्परांना दूर ठेवण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मनसे आणि अपक्षांची मदत घेऊन शिवसेनेला अद्दल घडविण्याची व्यूहरचना करण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत, तर शिवसेनेलाही भाजपला दूर ठेवून सत्ता हवी आहे. शिवसेनेने पाठिंबा मागितला तरी तो सहजपणे दिला जाणार नसून अडीच वर्षे महापौरपद किंवा सत्तेत निम्मा वाटा, यासह काही अटी मान्य केल्या तरच तो दिला जाईल, असे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.
कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजप आणि शिवसेना दोघांनाही सत्ता मिळविण्याची संधी आहे. दोघांपैकी कोणालाही बहुमत नसल्याने मनसे आणि अपक्षांची मदत घेऊनच पावले टाकावी लागणार आहेत. शिवसेनेची सत्ता आणण्यासाठी शिवसेना नेते व मंत्री एकनाथ िशदे, खासदार अनिल देसाई यांनी अपक्षांशी बोलणी सुरू केली आहेत. तर भाजप खासदार कपिल पाटील यांच्यासह काही नेत्यांनी अपक्षांशी संपर्क साधला आहे. शिवसेना व भाजप यांच्यात राज्य सरकारमध्ये आणि महापालिका निवडणूक प्रचारात जोरदार खणाखणी झाली. त्यामुळे एकमेकांना दूर ठेवून सत्ता मिळविण्याचे सर्व पर्याय दोघांकडून अजमावले जात आहेत. भाजपच्या अटी शिवसेनेने मान्य केल्या, तरच पाठिंबा द्यावा, असे काही भाजप नेत्यांचे मत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशिरा ‘वर्षां’ निवासस्थानी भाजप नेत्यांशी चर्चा केली. ठाकरे यांनी पक्षाचे आमदार व अन्य नेत्यांची महत्त्वाची बैठक मंगळवारी शिवसेनाभवनात बोलाविली आहे, तर भाजपच्या सुकाणू समितीची बैठकही होणार आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांचे धोरण काय राहील, याची दिशा मंगळवारी स्पष्ट होणे अपेक्षित आहे. पण लगेच निर्णय होण्याची शक्यता कमी असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोणत्याही परिस्थितीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पाठिंबा देण्याची विनंती करणार नाहीत. त्यापेक्षा २५ वर्षांचा मित्र असलेल्या भाजपचा पाठिंबा मिळविला जाईल.
– शिवसेनेतील सूत्रांनी ,दिलेली माहिती

’शिवसेनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप सरकारवर वारंवार केली जाणारी टीका पाहता शिवसेनेला अद्दल घडविण्याची भाजपची मानसिकता आहे.

’शिवसेनेने सन्मान दिला तरच सत्तेत सहभागाची चर्चा करू, असे भाजपच्या सूत्रांनी सांगितले. तसेच कल्याण-डोंबिवलीत सत्तास्थापनेसाठी भाजपलाही जास्त संधी असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp searching news partner in kdmc to keep shiv sena away
First published on: 03-11-2015 at 04:55 IST