कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजपबरोबर युती होऊ शकते, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. मात्र कोल्हापूर महापालिका निवडणुकीत भाजपशी युती करण्याबाबत कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
कल्याण-डोंबिवलीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक वसंत भगत, माधुरी काळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जगन्नाथ शिंदे यांचा मुलगा नीलेश शिंदे त्याचबरोबर अपक्ष नगरसेवक मयूर पाटील यांनी ठाकरे यांच्या उपस्थितीत गुरुवारी शिवसेनेत प्रवेश केला.
जिवंत पकडलेल्या पाकिस्तानी अतिरेक्याबाबत विचारता ‘ज्यांना आधी दया येते, त्यांना बोलू दे, मी योग्य वेळी बोलेन,’ अशी टिप्पणी ठाकरे यांनी केली.
कल्याण-डोंबिवलीत युती करण्याबाबत अजून कोणताही ठोस प्रस्ताव व जागावाटपाचा विचार सुरू नसल्याचे सूत्रांनी सांगितले. कोल्हापूरमध्ये शिवसेनेशी युती करण्यास भाजपच्या नेत्यांचा विरोध असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी चर्चेनंतर मार्ग निघू शकतो, असे संबंधितांनी स्पष्ट केले.