राज्यातील काही मंत्र्यांनी दर कराराच्या आधारे केलेल्या चिक्कीसह सर्वच खरेदी व्यवहारांतील घोटाळ्यामुळे सरकारने जनतेचा विश्वास गमावला आहे. त्यामुळे आरोप असलेल्या मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत आणि या घोटाळ्याची उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तीच्या माध्यमातून चौकशी करावी, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गुरूवारी विधान परिषदेत केली. भ्रष्टाचार विरहित कारभार देण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेलया मुख्यमंत्र्यांच्या कारभारावरही संशयाचा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगत त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले.
शरद रणपिसे, भाई जगताप आदींनी नियम २६० अन्वये मर्जीतील ठेकेदारांना कामे देण्यासाठी महिला वा बालकल्याण, शिक्षण, आदिवासी विकास, आरोग्य विभागाने दरकराराच्या आधारे केलेल्या खरेदीतील घोटाळ्याच्या आरोपांबद्दल चर्चा उपस्थित केली होती.  मुंडे म्हणाले, महिला व बालकल्याण विभागाने ई-निविदा प्रक्रिया न राबवता बालकांच्या आरोग्यास अपायकारक चिक्कीसह विविध २४ वस्तूंची एकूण २०६ कोटींची खरेदी केवळ एका दिवसात करुन भ्रष्टाचाराचा विक्रम केला. या खरेदीतून केवळ राज्याच्या तिजोरीची लूट झाली नाही तर, राज्यातील ६० लाख बालकांच्या आरोग्याशी खेळ केला गेला. अशाच प्रकारे शिक्षण विभागातील १९१ कोटींची अग्नीशमनयंत्र खरेदी, खादी व ग्रामोद्योग विभागातील ३ कोटींच्या पुस्तक खरेदीसह सर्व भ्रष्टाचाराची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यात यावी.   चिक्की खेरदीबाबत २० मे रोजी सर्व पुराव्यानिशी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करूनही त्यावर कारवाई झाली नाही, लाचलुचपत प्रबिंधक विभागाडे तक्रार दाखल झाल्यानंतरही केवळ त्याच खात्याच्या सचिवाकडून खुलासा मागविण्यात आला. मात्र आदिवासी विकास विभागाने ई- निविदेच्या माध्यमातून शालेय साहित्याची खरेदी करण्याची केलेली प्रक्रि.या केवळ तोंडी तक्रारीच्या आधारे मुख्यमंत्र्यांनी स्थगित केली. हा दुहेरी न्याय का असा सवाल केला.
मुख्यमंत्र्यांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांकडून पूजा
अजित पवार यांचा विधानसभेत दावा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अधिकारी जुमानत नसून आषाढी एकादशीला विठ्ठलाची सपत्नीक पूजा करण्यासाठी गेले असताना जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना २० मिनिटे मंदिराबाहेर ताटकळत बाहेर ठेवले आणि आधी स्वत: पूजा आटोपली, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत केले. राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली असून पूर्णवेळ गृहमंत्री नेमण्याची मागणीही त्यांनी केली. अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत बोलताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले. जिल्हाधिकाऱ्यांची पूजा सुरू असताना मुख्यमंत्री मंदिराबाहेर उभे आहेत, याचा राग महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना आल्याने ते विश्रामगृहात निघून गेले. त्यांची समजूत काढून परत आणण्यात आले, असा दावा पवार यांनी केला.