पुढच्यावर्षी २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने आतापासूनच जय्यत तयारी सुरु केली आहे. मुंबईतील लोकसभेच्या जागा जिंकण्यासाठी  भाजपाने निवडणूक वॉर रुम बनवली असून तिथे रणनिती आखली जाणार आहे. प्रचाराचा प्लान आखताना टेक्नोलॉजीचा वापर करण्याबरोबरच बूथ लेव्हल कार्यकर्त्यांची महत्वाची भूमिका असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही वॉर रुम बनवली असून इथे असणारे तंत्रज्ञ आखलेल्या योजनेची अंमलबजावणी होतेय कि, नाही त्यावर लक्ष ठेवणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार वॉर रुम आणि पक्षामध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी पार पाडणार आहेत. २०१९ लोकसभा निवडणुकीत २०१४ सारखी ‘मोदी लाट’ नसेल, ही बाब ध्यानात घेऊन निवडणूक रणनिती बनवली जाईल असे सूत्रांनी सांगितले. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा बूथ स्तराच्या प्रचारावर विशेष भर असतो. त्यामुळे त्याच दृष्टीने भाजपाच्या हजारो कार्यकर्त्यांची फळी प्रचारासाठी तयार करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारकांच्या धर्तीवर विस्तारकांची एक टीम असेल. या टीमचे निवडणुकीच्या तयारीवर बारीक लक्ष असेल. बूथ स्तरापासून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न असेल असे भाजपाचे दक्षिण मध्य जिल्हा प्रमुख अनिल ठाकूर यांनी सांगितले. भाजपाचा एक बूथ स्तरीय कार्यकर्ता हजार ते १२०० मतदारांच्या संपर्कात असेल. तो मतदारांची जाती निहाय, सामाजिक, आर्थिक अंगाने माहिती गोळा करुन ती वॉर्ड लेव्हला पाठवेल.

त्यानंतर जिल्हा प्रमुख आपला अंतिम अहवाल वॉर रुमला पाठवेल. प्रत्येक बूथ कार्यकर्त्याला २५ कार्यकर्त्यांची एक टीम बनवावी लागेल. त्यांना निवडणुकीत कशा पद्धतीने काम करायचे त्याचे प्रशिक्षण दिले जाईल. २०१४ लोकसभा निवडणुकीत प्रस्थापित सरकारविरोधात जनभावना तीव्र असल्यामुळे भाजपाला सहज विजय मिळवता आला होता. पण २०१९मध्ये भाजपासमोर अनेक आव्हाने असतील. भाजपाला जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील तसेच पाच वर्षांपूर्वी शिवसेना त्यांच्यासोबत होती. लोकसभा निवडणूक दोन्ही पक्ष एकत्र लढणार कि, विरोधात ते अजून स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे तूर्तास तरी भाजपासमोर शिवसेनेचे मोठे आव्हान आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp sets up election war room in mumbai
First published on: 08-08-2018 at 12:56 IST