विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचेच सरकार येईल, असा विश्वास व्यक्त करत केंद्रीय गृहमंत्री, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कित्ता गिरवला आणि शिवसेना आणि युतीबाबत सूचक मौन बाळगले.

भाजप युतीसाठी चर्चा करत असला तरी लाचार नसून, प्रसंगी स्वबळावरही सरकार आणण्यास समर्थ असल्याचा संदेश शहा यांनी शिवसेनेला दिल्याचे मानले जाते. शिवसेना जागांचा हट्ट सोडण्यास तयार नाही. त्यामुळेच नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाजनादेश यात्रेच्या समारोपात शिवसेना व युतीचा उल्लेख केला नव्हता. मुख्यमंत्रिपदी पुन्हा देवेंद्र फडणवीस यांना बहुमताने निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी केले होते. त्यानंतर दोन दिवसांत युती होईल, असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले होते. मात्र, जागावाटपाचा तिढा कायम आहे. रविवारी गोरेगावमधील कार्यक्रमात अमित शहा यांनीही अनुच्छेद ३७० वरील भाषणावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच भाजप-शिवसेना युतीसंदर्भात काहीही भाष्य केले नाही. राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचेच सरकार येईल आणि देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील, असे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्राला देशात क्रमांक एकवर कायम ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुंतवणूक आकर्षति करण्याबरोबरच, शेतकऱ्यांना मदत करण्याचे आणि विविध क्षेत्रांत राज्याला पुढे आणण्याचे काम केले, असे कौतुकही शहा यांनी केले.

शिवसेनेने मित्रपक्षांच्या नऊ जागांसह जागा घ्याव्यात, अशी भाजपची भूमिका आहे. तर मित्रपक्षांसाठी भाजपनेच जागा सोडाव्यात आणि पुण्यासह काही शहरांत शिवसेनेचे आमदार नसले तरी जागा द्यावी, अशी शिवसेनेची अपेक्षा आहे.

शिवसेनेला ११७ जागांचा प्रस्ताव

विधानसभेसाठी जागावाटपात शिवसेनेने ११७ जागांवर राजी व्हावे, असा प्रस्ताव भाजपने ठेवला आहे. शिवसेना आणि भाजपच्या विद्यमान आमदारांची संख्या आणि भाजपकडे आलेले नवीन आमदार याची जाणीव ठेवून शिवसेनेने जास्त जागांचा हट्ट सोडावा, असे भाजपचे म्हणणे आहे. लोकसभा निवडणुकीवेळी भाजपने उदारपणा दाखवत शिवसेनेला अतिरिक्त जागा सोडली होती. आता शिवसेनेने राजकीय वस्तुस्थितीचा विचार करून भूमिका घ्यावी, अशी भाजपची अपेक्षा आहे. सेनेने नमती भूमिका घ्यावी, या दृष्टिकोनातून शहा यांनी भाजप स्वबळावर सत्ता मिळवण्यास समर्थ असल्याचे संकेत दिले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढील निर्णय घेण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू केली आहे. भाजप आणि शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये रविवारी रात्री उशिरा जागावाटपाबाबत चर्चा झाल्याचे समजते.

तुमच्यासह किंवा तुमच्याशिवाय..

‘कुछ भी हो या कुछ भी ना हो, हमारी जीत पक्की है,’ असे विधान अमित शहा यांनी केले. त्यांचा रोख युतीकडे होता. युती झाली तरी किंवा युतीशिवाय भाजपचेच सरकार येणार. आलात तर तुमच्यासह आणि नाही आलात तर तुमच्याशिवाय राज्यात भाजप पुन्हा सरकार आणण्यास समर्थ आहे, असा इशाराच शहा यांनी शिवसेनेला नाव न घेता दिल्याचे मानले जाते.

शहांची ‘मातोश्री’कडे पाठ

अमित शहा रविवारी मुंबईत असल्याने शनिवारी रात्री उशिरापर्यंत जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी चर्चा सुरू होती. सहमती झाल्यास ठाकरे यांच्या विनंतीनंतर अमित शहा यांनी थोडा वेळ दिला असता, असे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना शनिवारीच स्पष्ट केले होते. मात्र, शहा यांनी ‘मातोश्री’वर जाणे टाळले. शहा यांनी ‘मातोश्री’कडे पाठ फिरविल्याने युतीचा तिढा अद्याप कायम असून मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाच युतीबाबत चर्चेचे अधिकार देण्यात आले आहेत. युतीच झालीच, तर त्याची घोषणा करण्यासाठीही शहा येतीलच, अशी खात्री नसल्याचे भाजपच्या उच्चपदस्थ नेत्यांनी स्पष्ट केले. लोकसभेसाठी शिवसेनेशी युती करण्यासाठी शहा यांनी ‘मातोश्री’वर जाऊन ठाकरे यांची भेट घेतली होती. पुन्हा एकत्र चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते. पण त्यानंतर काही वेळा मुंबईत येऊनही शहा यांनी ‘मातोश्री’वर जाणे टाळले होते.