उपस्थिती, प्रश्न विचारणे, निधीचा वापर यात मागे; ‘प्रजा फाऊंडेशन’च्या अहवालातील दावा

मुंबई : विधिमंडळ अधिवेशनांतील उपस्थिती, मतदारांच्या वतीने विचारलेले प्रश्न, निधीचा वापर, मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी किंवा त्यांना दिलेली वेळ आदी मुद्दे लक्षात घेऊन प्रजा फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेने शहरातील ३२ आमदारांचे प्रगतीपुस्तक गुरुवारी जारी केले. या प्रगतीपुस्तकानुसार सर्वात निष्क्रिय आमदारांमध्ये शिवसेनेच्या पाच तर भाजपच्या एका आमदाराचा समावेश आहे. यात भाजपचे आमदार राम कदम यांचा क्रमांक शेवटचा असला आणि पाच वर्षांतील विधिमंडळ अधिवेशनांमध्ये फक्त एकच प्रश्न उपस्थित केला असला तरी ‘प्रजा’कडून त्यांनी लोकप्रिय आमदाराचा किताब पटकावला आहे.

दोन टप्प्यांमध्ये प्रजाने हे प्रगतीपुस्तक तयार करून आपली निरीक्षणे नोंदवली आहेत. विधिमंडळ अधिवेशनातील उपस्थिती, तिथे मतदारांच्या वतीने उपस्थित केले प्रश्न, त्यातील प्रमुख किंवा महत्त्वाच्या प्रश्नांची संख्या, गुन्हेगारी पाश्र्वभूमी, मतदारसंघात खर्च केलेला निधी ही माहिती संस्थेने विधान भवन, जिल्हाधिकारी कार्यालयातून, निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून मिळवली आहे. दुसऱ्या टप्प्यात सुमारे २३ हजार मतदारांचा किंवा नागरिकांच्या मुलाखती घेऊन आमदारांचे कार्य, मतदारांना सहज उपलब्ध होतात का, त्यांचा भ्रष्टाचार याबाबत माहिती घेतली. या सर्व मुद्यांवरून एकूण मुंबईचे आणि त्या त्या मतदारासंघतील नागरिकांचे जीवनमान उंचावले की ढेपाळले याबाबत निष्कर्ष नोंदवले आहेत.

भाजपच्या चौधरी लोकप्रिय, स्वच्छ प्रतिमेच्या

प्रजा फाऊंडेशनने या प्रगतीपुस्तकात शहरातल्या नऊ आमदारांना लोकप्रिय, स्वच्छ प्रतिमा आणि वचनबद्ध अशा तीन विभागांत गौरवले आहे. भाजपच्या आमदार मनिषा चौधरी यांना लोकप्रिय आणि स्वच्छ प्रतिमा असलेल्या आमदार ठरवण्यात आले आहे. लोकप्रिय आमदारांमध्ये भाजपचे शिवसेनेचे अजय चौधरी, भाजपचे मंगलप्रभात लोढा, राम कदम यांचा समावेश आहे. स्वच्छ प्रतिमा असलेल्या अमदारांमध्ये भाजपचे अमीत साटम, राज पुरोहित यांचा समावेश आहे.

अहवाल काय सांगतो?

*  शहरभर घेतलेल्या मुलाखतीतून २०१९मध्ये अनुक्रमे शिवसेनेचे सुनील शिंदे, कॉंग्रेसचे अमीन पटेल, अस्लम शेख, शिवसेनेचे सुनील प्रभू, भाजपच्या मनिषा चौधरी आणि अतुल भातखळकर यांच्या कार्यामुळे जीवनमान उंचावल्याचे ९२ टक्के नागरिकांनी सांगितले.

*  नागरिकांचा कौल किंवा मत हेच प्रमाण धरत शिवसेनेच्या तुकाराम काते(अणुशक्ती नगर), संजय पोतनीस(कलिना), रमेश लटके(अंधेरी पूर्व), सदा सरवणकर(माहीम), अशोक पाटील(भांडुप) आणि भाजपच्या राम कदम(घाटकोपर पश्चिम) यांच्या कार्यामुळे मतदारसंघातील नागरिकांनी जीवनमान उंचावलेले नाही, असे स्पष्ट केल्याचा दावा प्रजा संस्थेने केला.

*  २०१४चे हिवाळी अधिवेशन ते २०१८चे हिवाळी अधिवेशन या काळात याच मुद्यांवरील माहिती प्रमाणाआधारे प्रथम क्रमांकावर कॉंग्रेसचे अमीन पटेल यांना स्थान देण्यात आले. त्यापुढे अनुक्रमे शिवसेनेचे सुनील प्रभू, कॉंग्रेसचे अस्लम शेख, शिवसेनेचे सुनील शिंदे आणि कॉंग्रेसच्या वर्षां गायकवाड यांनी पहिल्या पाच कार्यक्षम आमदारांमध्ये स्थान पटकावले. या यादीत भाजपचे राम कदम अगदी तळाशी आहेत. त्यावर सेनेचे पाटील, लटके, भाजपचे सेल्वन तमील, सेनेचे पोतनीस यांचे क्रम आहेत.

*  प्रजाने गेल्या आठ वर्षांमधील माहिती गोळा करून कमीत कमी भ्रष्टाचार, जास्तीत जास्त निधीचा वापर, अधिवेशनातील प्रश्न, नागरिकांच्या भेटी या प्रमाणावर नागरिकांचे जीवनमान उंचावते, असा निष्कर्ष काढला आहे.

*  प्रजाने केलेल्या दाव्यानुसार २००९ ते २०१४ या काळात जीवनमान उंचावण्याचे प्रमाण ६० टक्क्यांवर होते. या काळात शहरातील आमदार भ्रष्टाचारी आहेत, असे ५७ टक्के नागरिकांचे मत होते.

*  २०१४ ते २०१८ या काळात जीवनमान उंचावण्याचे प्रमाण ६८ टक्क्यांवर आहे. या चार वर्षांमध्ये आमदार भ्रष्टाचारी आहेत, असे मत असणाऱ्यांचे प्रमाण ३६ वरून घसरून १५ टक्क्यांवर आले आहे.