अशोक चव्हाण यांचे स्पष्टीकरण

राज्यातील भाजप-शिवसेना सरकारच्या विरोधात सामान्य लोकांमध्ये संतापाची भावना आहे. लोकांशी संवाद साधून सरकारच्या अपयशाची गाथा मांडण्याबरोबरच भाजप-शिवसेना हे सत्ता राबविण्यास योग्य व विश्वासार्ह नाहीत हे पटवून देण्याकरिताच काँग्रेस पक्षाच्या वतीने उद्यापासून राज्यभर जनसंघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून काँग्रेस पक्ष अधिक लोकांच्या जवळ जाईल तसेच आगामी निवडणुकीत काँग्रेसला राज्यात पुन्हा गतवैभव प्राप्त होईल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.

आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर प्रदेश काँग्रेसच्या वतीने जनसंघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले असून, त्याची सुरुवात शुक्रवारी कोल्हापूरपासून होत आहे. ३१ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या काळात पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे अशी यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेच्या पाश्र्वभूमीवर ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत अशोक चव्हाण यांनी पक्षाची व्यूहरचना आणि यात्रेमागची भूमिका स्पष्ट केली.

जनसंघर्ष यात्रा काढण्यामागचा उद्देश काय?

केंद्रातील मोदी आणि राज्यातील फडणवीस सरकारच्या चुकीच्या धोरणांकडे लोकांचे लक्ष वेधणे हा यात्रेचा उद्देश आहे. राज्यातील भाजप-शिवसेना सरकारच्या विरोधात जनतेत प्रचंड अस्वस्थता आहे. निवडणुकीपूर्वी भारंभार आश्वासने देत हे दोन्ही पक्ष सत्तेत आले. पण बहुतांशी आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा होऊन वर्ष उलटले तरीही सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा अद्याप लाभ मिळालेला नाही. भाजप आणि शिवसेना सत्तेत भागीदार असले तरी गेली पावणेचार वर्षे सातत्याने परस्परांवर कुरघोडय़ा करीत आहेत. परस्परांवर चिखलफेक करणारे पक्ष जनतेची पार दिशाभूल करीत आहेत. शिवसेनेची मंडळी भाजपवर टीका करतात, पण सत्तेत मांडीला मांडी लावून बसतात. एकूणच फडणवीस सरकारच्या अपयशांवर लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न यात्रेच्या माध्यमातून केला जाणार आहे.

कोणत्या मुद्दय़ांवर फडणवीस सरकार अपयशी ठरले, असे वाटते ?

सर्वच आघाडय़ांवर फडणवीस सरकार अपयशी ठरले आहे. कृषी क्षेत्राची पीछेहाट झाली. दरवर्षी दोन कोटी रोजगारनिर्मितीचे मोदी यांचे आश्वासनही हवेत विरले आहे. राज्यात नव्याने गुंतवणूक होत नाही. औद्योगिक क्षेत्रात पोषक वातावरण तयार करण्यात फडणवीस सरकारला अपयश आले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही चालूच आहेत. शेतकऱ्यांना हमीभाव देण्याचे आश्वासन देण्यात आले असले तरी शेतकऱ्यांच्या शेतमालाला अद्यापही पुरेसा भाव मिळत नाही. गेल्या वर्षभरात शेतकरी, दूध उत्पादकांचे संप झाले. हे संप सरकारच्या विरोधातच होते. रस्त्यांची अवस्था राज्यभर सर्वत्र वाईट आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात वाहतूक कोंडीचा फटका नागरिकांना बसत आहे. नोटाबंदीमुळे लघूउद्योजकांचे नुकसान झाले. मोदी किंवा फडणवीस सरकारच्या काळात काही मूठभर लोकांचा अपवाद वगळल्यास कोणाचेच भले झालेले नाही. ‘अच्छे दिना’चे स्वप्न दाखवून भाजप सत्तेत आला, पण लोकांचा आता भ्रमनिरास झाला आहे.

सध्या राज्यात अटकसत्र सुरू झाले आहे, याबाबत पक्षाची भूमिका?

बॉम्बस्फोट किंवा दहशतवादी कारवाया घडवून आणणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई झालीच पाहिजे. पण याबाबत सरकार गंभीर दिसत नाही. संभाजी भिडे यांना अटक केली जात नाही पण त्याच वेळी डाव्या विचारांच्या विचारवंत, लेखक, वकिलांना अटक करण्यात आली. सनातन संस्थेच्या विरोधात फडणवीस सरकार नरमाईचे धोरण घेताना दिसते. भिडे यांना एक न्याय तर इतरांना वेगळा यावरूनच सरकारच्या हेतूविषयी शंका येते. मुक्तपणे लेखन करणे किंवा विचार मांडण्यास भाजप सरकारच्या काळात लेखक, पत्रकारांवर बंधने आणण्यात येत आहेत. भाजप सरकारचे हेतू साफ नाही हेच यावरून स्पष्ट होते.

राज्यात समविचारी पक्षांची महाआघाडी मूर्त स्वरूप घेईल असे वाटते का?

राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचा धोरणात्मक निर्णय नवी दिल्लीत झाला आहे. जागावाटपाची चर्चाही लवकरच सुरू होईल. जागावाटपाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. अन्य समविचारी पक्षांना बरोबर घेण्याचा प्रस्ताव आहे व तशी चर्चा सुरू आहे.

जनसंघर्ष यात्रेचा फायदा होईल असे वाटते का ?

हो नक्कीच फायदा होईल. सामान्य लोकांमध्ये भाजप-शिवसेना सरकारच्या विरोधात नाराजी आहे. या नाराजीला यात्रेच्या माध्यमातून वाट करून दिली जाईल. काँग्रेस पक्षाला तळागाळातील जनतेचा पाठिंबा आहे. पहिल्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्र, दुसऱ्या टप्प्यात २ ऑक्टोबरपासून उत्तर महाराष्ट्र, तिसरा टप्पा मराठवाडा असे पुढील तीन – साडेतीन महिने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. सर्वच पातळीवर अपयशी ठरलेल्या फडणवीस सरकारला धक्का देण्यात काँग्रेस पक्ष नक्कीच यशस्वी होईल.