मेट्रो रेल्वे प्रकल्प-३’साठी लागणारी पालिकेची जागा देण्याचा प्रस्ताव शिवसेनेने पालिका सभागृहात दप्तरी दाखल केल्याचे उपटे भाजपने शुक्रवारी काढले. पालिकेची पूर्वपरवानगी न घेता नियमबाह्य़ बांधकाम केल्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनला दिलेला कांदिवली येथील पालिकेचा भूखंड परत ताब्यात घेण्यासाठी शिवसेनेने मूळ प्रस्ताव चर्चेसाठी सुधार समितीमध्ये आणला होता. भाजपने हा प्रस्ताव दप्तरी दाखल करीत शिवसेनेला धोबिपछाड दिली. मात्र शिवसेना आणि भाजपच्या वादामध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनचा फायदा झाला असून हा भूखंड आता असोसिएशनच्याच ताब्यात राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महापालिकेची मैदानांसह काही भूखंड ‘मेट्रो रेल्वे प्रकल्प-३’साठी देण्यात यावे यासाठी भाजप आग्रही होते. त्याबाबतचा प्रस्ताव पालिका सभागृहात चर्चेला आल्यानंतर भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेने तो दप्तरी दाखल केला. त्यामुळे आता पालिकेचे हे भूखंड ‘मेट्रो’च्या कामासाठी मिळण्यात अडचण निर्माण झाली आहे. यामुळे भाजप नगरसेवक प्रचंड संतापले आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनला पालिकेने २००५ मध्ये कांदिवली येथील महावीर नगरमधील एक भूखंड सभागृहाच्या मंजुरीनंतर दिला होता. या भूखंडावर पालिकेची पूर्वपरवानगी न घेता बांधकाम करण्यात आले असून बिअर बारही सुरू करण्यात आला आहे. तसेच तेथे सर्वसामान्य मुंबईकरांना प्रवेश नाकारण्यात येत होता. सभासदत्वासाठी मोठी रक्कमही स्वीकारण्यात येत होती. ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून शिवसेना नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी हा भूखंड देण्याबाबतचा मूळ प्रस्ताव सभागृहात चर्चेला आणण्याची मागणी २०१३ मध्ये केली होती. सभागृहात चर्चेअंती भूखंड ताब्यात घेण्याची मागणी करीत हा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्यात आला. या मूळ प्रस्तावाला सुधार समितीने मंजुरी दिल्यामुळे तो या समितीतही फेरविचारार्थ आणण्याची मागणी शिवसेनेच्या नगरसेवकाकडून करण्यात आली होती. त्यानुसार याबाबतचा मूळ प्रस्ताव शुक्रवारी सुधार समितीच्या बैठकीत चर्चेसाठी आला. ‘मेट्रो-३’च्या कामासाठी पालिकेचे भूखंड देण्याचा प्रस्ताव दप्तरी दाखल करीत शिवसेनेने थेट मुख्यमंत्र्यांना धक्का दिला होता. त्याचे उटे काढण्यासाठी सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनला दिलेल्या भूखंडाचा मूळ प्रस्ताव चर्चेविनाच दप्तरी दाखल करण्याचे आदेश दिले. पालिका सभागृहाने २०१३ मध्ये हा भूखंड ताब्यात घेण्यावर एकमत करीत मूळ प्रस्ताव दफ्तरी दाखल केला होता. मात्र आजतागायत प्रशासनाने हा भूखंड ताब्यात घेतलेला नाही. आता सुधार समितीने भूखंड ताब्यात घेण्याबाबत फेरविचार करण्याचा प्रस्ताव दप्तरी दाखल केल्यामुळे तो मुंबई क्रिकेट असोसिएशनच्याच ताब्यात राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शिवसेना नगरसेवक अनभिज्ञ
प्रकाश गंगाधरे यांनी हा प्रस्ताव दप्तरी दाखल केला त्याची सुधार समितीच्या बैठकीत उपस्थित असलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांना कल्पनाच नव्हती. अध्यक्षांनी प्रस्ताव कधी पुकारला आणि कधी दप्तरी दाखल केला हे त्यांना कळलेच नाही. बैठकीमध्ये दिल्या जाणाऱ्या अल्पोपहारावर ताव मारण्यात शिवसेनेचे नगरसेवक दंग होते. त्यांचे कामकाजाकडे लक्ष नसल्याने भाजपचे फावले आणि हा प्रस्ताव दप्तरी दाखल झाला.