28 January 2020

News Flash

भाजप-शिवसेनेत अखेर युती

लोकसभेसाठी २५-२३ तर विधानसभेसाठी समसमान जागा

भाजप आणि शिवसेनेतील युतीची घोषणा सोमवारी मुंबईत झाली. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजप अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

भाजपच मोठा भाऊ ; लोकसभेसाठी २५-२३ तर विधानसभेसाठी समसमान जागा

मुंबई : परस्परांवर टोकाची टीका  आणि स्वबळावर लढण्याची भीमगर्जना करूनही  शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने अखेर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी युतीची घोषणा केली. लोकसभेसाठी शिवसेनेला २३ आणि भाजपला २५, तर विधानसभेसाठी मित्रपक्षांच्या जागा सोडून उरलेल्या जागांचे समसमान वाटप, या तत्त्वावर युती झाली आहे. युतीसाठी भाजपने एक पाऊल मागे घेतले असले तरी शिवसेनेला मोठय़ा भावाचा मान मात्र दिलेला नाही.

मध्यंतरी उभयतांमधील संबंध काहीसे ताणले गेले होते, पण उद्धव ठाकरे यांनी मन मोठे केल्याने आता कटुता संपली असून दोघेही पुन्हा एकत्र आलो आहोत. यातून महाराष्ट्रातील ४८ पैकी लोकसभेच्या ४५ जागा जिंकू असे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले. तर, युती करीत असलो तरी भाजप नेतृत्वाकडून पुन्हा कटू अनुभव येता कामा नये, अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. ‘पहारेकरी चोर आहे’ अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सुरात सूर मिसळत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केल्यानंतर आणि अगदी कालपरवापर्यंत केंद्र आणि राज्य सरकारवर विखारी टीका करून स्वबळाचा नारा देत राहिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अखेर हिंदुत्व, राम मंदिर आणि अविचारी लोकांच्या आघाडीला पुन्हा सत्तेवर येण्यापासून रोखण्याचे कारण देत युती करीत असल्याचे जाहीर केले. लोकसभेसाठी गेल्या वेळीपेक्षा शिवसेनेला एक जागा जास्त सोडण्यात आली आहे. गेल्यावेळी म्हणजे २०१४ मध्ये भाजपने २६ तर शिवसेनेने २२ जागा लढविल्या होत्या. आता भाजप २५ जागांवरच लढणार आहे. राज्यातील सत्तापदांमध्येही समानतेचा निकष लावण्यात येईल, या सूत्रावर युती झाली आहे.

स्वबळावर निवडणुका लढवण्याचा ठराव जानेवारी २०१८ मध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत केल्यानंतर वर्षभरापासून शिवसेना आणि उद्धव ठाकरे हे सातत्याने भाजपवर, त्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर सातत्याने आणि प्रसंगी शेलक्या भाषेतही टीका करत होते. मात्र, या सर्व भूमिका गुंडाळून ठेवत उद्धव ठाकरे युतीला राजी झाल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सायंकाळी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर मुख्यमंत्री फडणवीस, ठाकरे आणि शहा यांनी वरळी येथील पत्रकार परिषदेत युतीची घोषणा

केली.

मुख्यमंत्रिपदावर शिवसेनेचा दावा होता. पण याबाबत काहीच जाहीर करण्यात आलेले नाही. फक्त सत्तेत पदे आणि जबाबदारीचे समान वाटप केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. याचा अर्थ शिवसेनेने मोठय़ा भावाचा मान मिळण्याविषयी आधी धरलेला आग्रह सोडून दिला आहे.

उद्धव ठाकरे आणि राज्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांना काहीही वाटत असले, तरी शिवसेनेच्या खासदार-आमदारांचा युतीसाठी दबाव होता. त्यांच्या मताची दखल घेत १५ वर्षांनी मिळालेली सत्ता राग-लोभातून घालवण्याऐवजी उद्धव यांनी युती करत पुन्हा सत्ता मिळवण्यास कौल दिला.

२३वी जागा कोणती ?

लोकसभेत भाजप २५ तर शिवसेना २३ जागा लढविणार असल्याचे जाहीर करण्यात आले. गेल्या वेळी भाजपने २६ तर शिवसेनेने २२ जागा लढविल्या होत्या. उभयतांनी आपल्या मित्र पक्षांना प्रत्येकी एक जागा सोडली होती. यंदा शिवसेनेच्या वाटय़ाला २३ जागा येणार आहेत.

उद्धव ठाकरे यांनी २३वी जागा कोणती हे लवकरच ठरेल, असे नमूद करत २३व्या जागेचा तिढा कायम असल्याचे सूचित केले. ही जागा बहुधा पालघरची असू शकते.

 

नाणार प्रकल्प अन्यत्र हलविणार

कोकणातील नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प रद्द करण्याची  सेनेची अट मुख्यमंत्र्यांनी मान्य केली. जेथील नागरिकांची अनुकूलता असेल तेथेच हा प्रकल्प उभारण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे नाणार प्रकल्प रद्द होणार हे स्पष्ट झाले. याचा फायदा शिवसेनेला कोकणात आगामी निवडणुकीत होऊ शकतो.

हिंदुत्व, राम मंदिर आणि शेतकरी समान धागा

’५० वर्षे ज्या काँग्रेससारख्या पक्षांशी लढलो त्यांच्या हातात देशाची सत्ता पुन्हा जाऊ नये म्हणूनच युतीचा निर्णय घेतल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

’हिंदुत्व, राम मंदिर आणि शेतकऱ्यांना मदत हा भाजप आणि शिवसेनेत समान धागा आहे. अयोध्येतील ६७ एकर जागा राम मंदिर उभारणीसाठी मिळावी, अशी आग्रही भूमिका केंद्राने घेतली आहे.

’ यावरून भाजपची भूमिका स्पष्ट आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार कटिबद्ध आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

’राम मंदिर, देशाची सुरक्षा या मुद्दय़ांवर भाजप आणि शिवसेनेत समान धागा आहे, असे सांगत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना आणि अकाली दल हे दोन भाजपचे जुने मित्रपक्ष असल्याचा उल्लेख केला.

शिवसेना-भाजप यांच्यात युती होण्याचे संकेत ‘लोकसत्ता’ने वर्षभरापूर्वीच ११ फेब्रुवारी आणि १६ फेब्रुवारी २०१८ च्या अंकांतील बातम्यांद्वारे दिले होते.

 

 

First Published on February 19, 2019 4:14 am

Web Title: bjp shiv sena finally declare alliance in maharashtra
Next Stories
1 Maratha reservation : शिफारस करणारा आयोगच घटनाबाह्य़!’
2 निवृत्त सनदी अधिकारी के. पी. बक्षी यांच्या व्यवहारांची चौकशी
3 जेजेच्या डॉ. कटके पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
Just Now!
X