News Flash

आता पेंग्विन दर्शनावरून शिवसेना-भाजपामध्ये कलगीतुरा

पेंग्विनच्या दर्शनगृहाच्या उभारणीतील विलंबामुळे पेंग्विन दर्शन लांबणीवर पडले होते.

शिवाजी पार्कातील ‘सेल्फी पॉइंट’वरून शिवसेना-भाजपात रंगलेल्या ‘सेल्फी’श लढाईचा दुसरा अंक शुक्रवारी वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात पेंग्विन दर्शनाच्या निमित्ताने पाहायला मिळाला. महापौर निवडणुकीपूर्वी हम्बोल्ट पेंग्विन दर्शनगृह खुले व्हावे यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. मात्र पेंग्विनच्या दर्शनगृहाच्या उद्घाटनात भाजपाच्या हस्तक्षेपामुळे दिरंगाई होत असल्याचा आरोप करत शिवसेनेने हे दर्शनगृह लवकरात लवकर खुले करण्याची मागणी केली आहे. इतकेच नव्हे तर ‘शिवसेनेचाच महापौर पेंग्विन दर्शनगृहाचे उद्घाटन करणार!’ असा पक्का निर्धार शिवसेनेने केला आहे.

मुंबईतील भायखळा जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयात जुलैमध्ये आलेल्या पेंग्विन या परदेशी पाहुण्याच्या दर्शनाकरिता महापालिकेने ७ डिसेंबर २०१६ ही तारीख निश्चित केली होती. मात्र त्यानंतर एका पेंग्विनच्या मृत्यूमुळे उठलेले काहूर आणि पेंग्विनच्या दर्शनगृहाच्या उभारणीतील विलंबामुळे पेंग्विन दर्शन लांबणीवर पडले होते.

मात्र शुक्रवारी नवीन दर्शनगृहातील स्थिरस्थावर झालेल्या पेंग्विनना पाहण्यासाठी आलेल्या स्थायी समितीच्या सदस्यांना मात्र हे पेंग्विन क्वारंटाईन परिसरात न दिसल्याने आलेले सदस्य नाराज झाले. महापौरांनी आयुक्तांना पत्र लिहून ६ मार्च रोजी उद्घाटन करण्याच्या सूचना दिल्या होत्या मात्र त्यानंतरही मुद्दाम पेंग्विन दर्शनासाठी दिरंगाई केली जात असल्याचा आरोप आलेल्या स्थायी समितीच्या सदस्यांनी केला. भाजप आयुक्तांच्या माध्यमातून वेळकाढूपणा करीत आहे, असे वक्तव्य स्थायी समितीच्या सदस्य श्रद्धा जाधव यांनी केले. मात्र पेंग्विन दर्शनगृहाच्या खोलीतील हवा व पाण्याच्या नमून्याचा अहवाल नकारात्मक असल्याने पेंग्विनना हलविण्यात आले नाही, असे भायखळा जिजाबाई भोसले उद्यानातील अधिकाऱ्यांनी सांगितले. तर पेंग्विन दर्शन सुरू करण्याबाबत राजकारण केले जात असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते प्रवीण छेडा यांनी केला आहे. पेंग्विनसाठी पालिकेकडून टॅंकरने पाणी पुरविले जात असतानाही ही दिरंगाई का असा सवाल छेडा यांनी केला आहे.

हम्बोल्ट पेंग्विन दर्शनगृहात छोटेखानी उपहार गृह उभारण्यात येणार आहे. मात्र अजूनपर्यंत हे बांधकाम पूर्ण झाले नसून याला विलंब लागणार आहे. पेंग्विनना दर्शनगृहात हलविण्यात आल्यानंतर त्यांना त्या जागेशी जुळता येत असल्याची खात्री जमा केल्यानंतरच दर्शनगृह खुले करण्यात येणार आहे. या सर्व प्रकारात ८ ते १० दिवस लागण्याची शक्यता असून तुर्तास तरी मुंबईकरांना पेंग्विन दर्शनासाठी वाट पाहावी लागणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2017 1:17 am

Web Title: bjp shiv sena penguin
Next Stories
1 मटक्याचे आकडे प्रसिद्ध करण्यास वृत्तपत्रांना मनाई
2 एल अँड टी, शापुरजी पालनजी यांच्या बीडीडी चाळ पुनर्विकासासाठी निविदा
3 पालिकेवर कारवाई केल्यास मुंबईचे आरोग्य बिघडणार
Just Now!
X