आता युती तोडायचीच.. स्वबळावरच विधानसभा लढायची.. नुकसान स्वीकारून तडजोड करायची नाही.. अशा ‘शतप्रतिशत’च्या घोषणा देत भाजपने शड्डू ठोकून शिवसेनेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला असला तरी गेल्या अडीच दशकांपासून असलेली युती टिकवून ठेवण्यासाठी दोन्ही पक्ष प्रयत्नशील असून जागावाटपाची बोलणी आठवडाभरात सुरू होण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये प्रवेशासाठी अन्य पक्षांमधील नेत्यांची रीघ लागली असून मनाप्रमाणे जागावाटप झाले तर शिवसेनेशी युती ठेवायची, नाही तर नुकसान स्वीकारून तडजोड करायची नाही, असा भाजपचा पवित्रा आहे.
काहीही झाले तरी भाजपचाच मुख्यमंत्री राज्यात सत्तारूढ व्हावा, यासाठी पावले टाकण्यात येत आहेत आणि या भूमिकेला केंद्रीय नेतृत्वाने हिरवा कंदील दाखविला आहे. विधानसभेसाठी शिवसेना १६९ तर भाजप ११९ जागा लढविते. लोकसभा निवडणुकीतील घवघवीत यशामुळे विधानसभेसाठी अधिक जागा वाटय़ाला याव्यात, असा भाजपचा प्रयत्न आहे. युतीतील जागावाटप झाल्यावर आणि भाजपला अधिक जागा मिळाल्यावर महायुतीतील अन्य पक्षांसाठी कोणत्या व किती जागा सोडायच्या, याचा विचार केला जाईल, असे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस व अन्य नेत्यांमध्ये आठवडाभरात चर्चेला सुरुवात होण्याची शक्यता सूत्रांनी ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केली.
युतीमध्ये आपली गळचेपी होत असल्याची भावना भाजप कार्यकर्त्यांमध्ये अनेक वर्षे आहे. ती खदखद भाजपच्या राज्य परिषदेत गुरुवारी व्यक्त झाली. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी शुक्रवारी सावध प्रतिक्रिया व्यक्त करीत महायुतीचीच सत्ता येईल, असा सूर आळविला आहे. राज्यातील २८८ जागा लढविण्याची तयारी करण्याच्या सूचना दोन्ही पक्षांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मात्र युती तोडण्यासाठी त्यांची मानसिक तयारी अजून झालेली नाही. अजूनही सूर जुळतील, अशी आशा त्यांना वाटत आहे. शिवसेनेनेही जागावाटपाची बोलणी लवकरात लवकर सुरू करण्यासाठी अनुकूलता दाखविली आहे. त्यामुळे इतके दिवस प्रसिद्धीमाध्यमे आणि वेगवेगळ्या व्यासपीठांवरून दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतल्या असल्या तरी जागावाटपाच्या बैठकींना आता सुरुवात होणार आहे.

आमच्याही शिबिरात स्वबळाची भाषा केल्यावर उत्साह असतो. त्यामुळे भाजपचे अध्यक्ष माझ्याशी जोपर्यंत बोलत नाहीत तोपर्यंत याबाबत विचार करण्याची काहीही आवश्यकता नाही.
उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख