मुंबई : मुंबई महापालिकेतील पाच प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी गुरुवारी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या ताब्यात असलेल्या दोन समित्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने शिवसेनेने काबीज केल्या. पाच समित्यांपैकी दोन समित्यांवर बिनविरोध निवड झाली असून त्यापैकी एक समिती शिवसेनेला, तर दुसरी समिती भाजपला मिळाली. तर उर्वरित तीनपैकी दोन समित्यांवर शिवसेनेचा, तर एका समितीवर भाजपचा विजय झाला.

मुंबई महापालिकेतील के-पूर्व, के-पश्चिाम, पी-दक्षिण, पी-उत्तर आणि एल या पाच प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक गुरुवारी पालिका मुख्यालयात पार पडली. या पाचपैकी एल प्रभाग समिती वगळता अन्य चारही समित्या भाजपकडे होत्या. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पार्टीने चंग बांधला आहे. त्यामुळे गुरुवारी झालेल्या निवडणुकीत चित्र बदलले.

के-पूर्व प्रभाग समितीमध्ये शिवसेना पाच, भाजप पाच, काँग्रेस चार असे संख्याबळ आहे. मागील वर्षी काँग्रेस तटस्थ राहिल्यामुळे शिवसेना आणि भाजपची मते समसमान झाली. त्यामुळे चिठ्ठी टाकून निकाल जाहीर करण्यात आला. त्यावेळी भाजपच्या बाजूने कौल मिळाला आणि ही समिती भाजपच्या पदरात पडली. मात्र गुरुवारी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने शिवसेनेला मतदान केले. त्यामुळे शिवसेना उमेदवार प्रियांका सावंत आठ मते मिळवून विजयी झाल्या.

के-पश्चिम प्रभाग समितीमध्ये शिवसेना चार, भाजप सात, काँग्रेस दोन असे संख्याबळ असून या निवडणुकीत भाजपचे संख्याबळ अधिक ठरले. भाजपच्या सुधा सिंग सात मते मिळवून विजयी झाल्या.

विजय सोपा

पी-दक्षिण प्रभाग समितीत भाजपचे संख्याबळ अधिक असल्याचे लक्षात घेऊन शिवसेनेने आपला उमेदवार रिंगणात उतरविला नव्हता. भाजप उमेदवार हर्ष पटेल यांचा एकमेव अर्ज सादर झाला होता. त्यामुळे हर्ष पटेल यांना विजयी घोषित केले. या प्रभागात शिवसेनेचे तीन, तर भाजपचे सात नगरसेवक आहेत. एल प्रभाग समितीमध्ये शिवसेनेचे आठ, भाजपचे दोन, काँग्रसचे तीन आणि राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक असे संख्याबळ आहे. शिवसेनेचे संख्याबळ अधिक असल्याने भाजपने या प्रभागात उमेदवार उभा केला नव्हता. शिवसेनेच्या आकांक्षा शेट्ये यांचा एकमेव अर्ज सादर झाला होता. त्यामुळे शेट्ये यांना विजयी घोषित करण्यात आले.