शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मुंबईतील ‘पूर परिस्थिती’वरून भाजपने केलेल्या टीकेची सव्याज परतफेड केली. दोन दिवसांपूर्वी भेंडीबाजारात कोसळलेल्या इमारतीचा मुद्दा पुढे करत त्यांनी राज्य सरकारच्या गृहनिर्माण धोरणावर ताशेरे ओढले. ते शनिवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. मुंबईत पाणी साचल्यानंतर पालिकेला जबाबदार धरले जाते. पण मुंबईत सुरू असलेली मेट्रोची कामे आणि रेल्वे सेवेची काहीच जबाबदारी नाही का, असा सवाल त्यांनी विचारला. मुंबई आमची आहे, हे शहर आमचं घर आहे, ही भावना कायमच शिवसैनिकांमध्ये असते. त्यामुळे पूर येतच राहणार आणि माणसं मरत राहणार, असा विचार करण्याइतकी शिवसेना कोडगी नाही, असे उद्धव यांनी स्पष्ट केले.

तसेच सध्या सगळ्यांना केंद्रात होऊ घातलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराची चिंता लागली आहे. मात्र, शिवसेनेला मुंबईकरांच्या आरोग्याची चिंता आहे, असे सांगत त्यांनी भाजपला टोला लगावला. दोन दिवसांपूर्वी भेंडीबाजारात कोसळलेल्या इमारतीच्या मुद्द्यावरूनही त्यांनी राज्य सरकारच्या गृहनिर्माण धोरणावर ताशेरे ओढले. एवढ्या इमारती धोकादायक आहेत आणि एवढ्यांना आम्ही नोटीसा दिल्या, हे सांगण्यापलीकडे सरकारच्या गृहनिर्माण धोरणाची मजल जात नाही. केवळ अमूक-तमूक ठिकाणी जागा खाली झाल्यानंतर गरिबांना घरे देऊ, असे सांगितले जाते. निवडणुकीच्या प्रचारातही ‘पंतप्रधान आवास योजने’सारख्या लोकप्रिय घोषणा करून गरिबांना मोफत घरे देण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र, सरकारने अशा लोकप्रिय घोषणा देण्यापेक्षा धोकादायक इमारतीमधील नागरिकांची पर्यायी व्यवस्था करून आहे ती परिस्थिती सुधारावी, असे सांगत उद्धव यांनी भाजपवर निशाणा साधला.

पालिकेच्या बिल्डरधार्जिण्या वकिलांना डच्चू

या कार्यक्रमात उद्धव यांनी शिवसेनेकडून मुंबईत सुरू करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरांविषयी नगरसेवकांशी संवाद साधला. पावसानंतर शहरात रोगराई पसरू नये, यासाठी शिवसेनेकडून मुंबईत आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणी रस्ता कचऱ्यावर आला होता. त्यामुळे लोकांना लेप्टोसारख्या आजारांची लागण होऊ शकते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आल्याचे उद्धव यांनी सांगितले होते.

रहिवाशांचा म्हाडा अधिकाऱ्यांना घेराव