17 July 2019

News Flash

CSMT Fob Collapse: पूल दुर्घटनेसाठी पादचारी जबाबदार, भाजपा नेत्याचं अजब वक्तव्य

ऐन गर्दीच्या वेळी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जण मृत्युमुखी पडले, तर ३१ जण जखमी झाले

मुंबई महापालिकेच्या मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेला ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानका’जवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जण मृत्युमुखी पडले, तर ३१ जण जखमी झाले. या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसहित अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला. मात्र भाजपाच्या एका नेत्याने या दुर्घटनेसाठी पादचारी जबाबदार असल्याचं अजब विधान केलं आहे.

भाजपा प्रवक्त्या संजू वर्मा यांनी सीएसएमटी पूल दुर्घटनेसाठी थेट पादचाऱ्यांनाच जबाबदार ठरवलं आहे. टाइम्स नाऊशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. संजू वर्मा यांनी ही दुर्घटना नैसर्गिक असल्याचं सांगितलं. सोबतच सरकारचं याच्याशी काही घेणं देणं नसल्याचं सांगत हाट झटकण्याचा प्रयत्न केला आणि पादचारीच दुर्घटनेला जबाबदार असल्याचं म्हटलं. संजू वर्मा यांच्या वक्तव्यावर सोशल मीडियावर टीका होत आहे.

नरिमन पॉइंट, चर्चगेट आणि आसपासच्या परिसरातील कार्यालयांमधील नोकरदार मंडळी पूर्व उपनगरांत आपल्या घरी जाण्यासाठी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात येत असतात. त्यामुळे या परिसरात नागरिकांची प्रचंड वर्दळ असते. त्याच वेळी या परिसरात वाहनांचीही गजबज असते. सायंकाळी दादाभाई नौरोजी मार्ग गर्दीने फुलून जातो. या मार्गावरील बी. टी. लेन येथून टर्मिनसमध्ये जाणारा हिमालय पादचारी पुलाचा साठ टक्क्य़ांहून अधिक भाग गुरुवारी सायंकाळी ७.२० च्या सुमारास अचानक कोसळला आणि एकच गोंधळ उडाला.

पूल खाली पडताच पुलावरून जाणारे काही पादचारीही त्यासोबत कोसळले. हा भाग काही मोटारगाडय़ांवर कोसळून त्यांचेही नुकसान झाले. घटनेचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. या दुर्घटनेत अपूर्वा प्रभू (वय ३५), रंजना तांबे (४०), सारिका कुलकर्णी (३५), तपेंद्र सिंग (३५), जाहीद सिराज खान (३२) आणि मोहन कायगडे (५५) या सहा जणांचा मृत्यू झाला. अपूर्वा प्रभू आणि रंजना तांबे या जी. टी. रुग्णालयातील परिचारिका आहेत. जखमींना सेंट जॉर्ज रुग्णालय आणि जी. टी. रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जखमींमध्ये सोनाली नवले (वय ३०), अद्वित नवले (३), राजेंद्र नवले (३३), राजेश लोखंडे (३९), तुकाराम येडगे (३१), जयेश अवलानी (४६), महेश शेरे, अजय पंडित (३१), हर्षदा वाघले (३५), विजय भागवत (४२), निलेश पाटवकर, परशुराम पवार, मुंबलिक जयस्वाल, मोहन मोजडा (४३), आयुशी रांका (३०), सिराज खान (५५), राम कुपरेजा (५९), राजेदास दास (२३), सुनील गिरलोटकर (३९), अनिकेत अनिल जाधव (१९), अभिजीत मान (२१), राजकुमार चावला (४९), सुभेष बॅनर्जी (३७), रवी लागेशेट्टी (४०), नंदा विठ्ठल कदम (५६), राकेश मिश्रा (४०), अत्तार खान (४५), सुजय माझी (२८), कनुबाई सोलंकी (४७), दीपक पारिख यांचा समावेश आहे.

First Published on March 15, 2019 12:39 pm

Web Title: bjp spokeperson sanju verma blame pedestrians for csmt bridge collapse